आई-वडील खर्चासाठी पैसे देत नाहीत, फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला दुचाकी चोरीचा धंदा
By राम शिनगारे | Published: December 25, 2022 08:36 PM2022-12-25T20:36:16+5:302022-12-25T20:36:25+5:30
गुन्हे शाखेची कारवाई : दोघांकडून २२ लाख रुपयांच्या तब्बल ३६ दुचाकी जप्त
औरंगाबाद : आई-वडील खर्चासाठी पैसे देत नाहीत म्हणून दुचाकींची चोरी करण्याचा धंदाच फार्मसीच्या विद्यार्थ्याने सुरू केला. पोलिसांनी त्याच्याकडून १४ लाख ९५ हजार रुपयांच्या तब्बल २४ दुचाकी, तर त्याच्या मित्राकडून ७ लाख रुपये किमतीच्या १२ दुचाकी हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
शैलेश गोरख खेडकर (२०, रा. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव, मूळ गाव रा. आंबा, ता. कन्नड) या फार्मसीच्या विद्यार्थ्यासह विजय सूर्यभान अळींग (रा. आंबा, ता. कन्नड) अशी दुचाकी चोरांची नावे आहेत. शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातल्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी तपासाचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक तपास करताना शैलेश हा दुचाकींची चोरी करून आंबा येथील शेतात नेऊन ठेवत असल्याची माहिती मिळाली.
गुन्हे शाखेने शैलेशच्या शेतात छापा मारला. पोलिस आल्याचे समजताच शैलेश पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले. चौकशीत त्याने प्रोझोन मॉल येथून दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. शेतात लपवून ठेवलेल्या २४ दुचाकीही काढून दिल्या. गावातील मित्र विजय अळींग याच्याकडे काही चोरीच्या दुचाकी ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार अळींगच्या शेतात छापा मारल्यानंतर १२ दुचाकी सापडल्या.
दोन्ही आरोपींकडून तब्बल २१ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या ३६ दुचाकी हस्तगत केल्या असून, सहा पोलिस ठाण्यांतील ३७ गुन्हे उघडकीस आले. ही कारवाई सहायक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर, रमाकांत पटारे, अंमलदार संजय नंद, संदीप तायडे, सुनील बेलकर, संदीप राशिनकर, नितीन देशमुख, अजय दहिवाळ, विजय घुगे, धनंजय सानप, तातेराव शिनगारे यांनी केली.