औरंगाबादमध्ये सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीचं मुंडकं धडावेगळं केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 05:13 PM2021-12-05T17:13:05+5:302021-12-05T19:59:21+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावाला आणि त्याच्या आईला ताब्यात घेतलं आहे.
औरंगाबाद: महाराष्ट्रात ऑनर किलींगची घटना घडली आहे. प्रेम विवाह केल्यामुळे अल्पवयीन भावाकडून मोठ्या बहिणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यादरम्यान तरुणीच्या पतीने पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच 19 वर्षीय बहिणीची गळ्यावर कोयत्याचे वार करुन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुणीचे मुंडकेच धडावेगळे झाल्याची माहिती आहे. वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा गोयेगाव येथील रहिवाशी आहे. बहिणीला भेटण्यासाठी तो आपल्या आईसोबत रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्याने रागाच्या भरात आपल्या सख्ख्या बहिणीवर कोयत्याने वार केला.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशोरी मोटे(19)असे हत्या झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. किशोरीने सहा महिन्यापूर्वी पुण्यातील आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वीचे ती आपल्या पतीसोबत लाडगाव शिवारात राहण्यासाठी आली होती. याची माहिती मिळताच भावाने आईसोबत लाडगाव गाठले. यावेळी बहिणीला पाहून त्याला राग अनावर झाला आणि त्याने कोयत्याने बहिणीच्या गळ्यावर सपासप वार केले. हा सर्व प्रकार पाहून किशोरीच्या पतीने पळ काढला आणि आपला जीव वाचवला. शेजारील काही लोकांना या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आईला ताब्यात घेतले आहे.