शहरात विक्रीसाठी आणलेला साडेसहा किलो गांजा पकडला
By राम शिनगारे | Published: November 13, 2022 08:46 PM2022-11-13T20:46:47+5:302022-11-13T20:47:02+5:30
मुकुंदवाडी पोलिसांची कामगिरी : १ लाख ९० हजारांचा मुद्देमालही जप्त
औरंगाबाद: ग्रामीण भागातुन शहरात विक्रीसाठी आणलेला ६ किलो ५३७ ग्रॅम एवढा गांजा मुकुंदवाडी पोलिसांनी सापळा रचून पकडला आहे. या कारवाईत १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या गांजासह १ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत दोन जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.
नंदकुमार रामभाऊ काळे व तुषार शिवाजी राऊत (दोघे रा. शिवना, ता. सिल्लोड) अशी आरोपीची नावे आहेत. मुकुंदवाडी ठाण्यातील सपोनि सचिन मिरधे यांना दोन जण गांजीविक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांची परवानगी घेत निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात एपीआय कॉर्नर परिसरात ११ नोव्हेंबर रोजी रात्री सापळा लावण्यात आला. त्यानुसार संशयीत आरोपी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच २० एफएक्स ८६३६) आले.
संशयीत असल्यामुळे पंचाच्या समक्ष दुचाकी थांबवून चौकशी केल्यानंतर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या पाठीवरील बॅगमध्ये ६ किलो ५३७ ग्रॅम एवढा गांजा आढळला. या गांजाची एकुण किंमत १ लाख २० हजार रुपये एवढी आहे. गांजाच्या एकुण तीन पुड्या होत्या. त्याचे एकत्रित वजन केल्यानंतर जप्त करण्यात आला. त्याशिवाय गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकीही जप्त केली. ही कारवाई सपोनि. मिरधे, पोलीस शिपाई चव्हाण, भोटकर, इंळे चव्हाण, पांढरे आदीनी केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवित अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि शैलेश देशमुख करीत आहेत.
आरोपींना पोलीस कोठडी
गांजा विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या आरोपींना अटक करीत मुकुंदवाडी पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचे निरीक्षक गिरी यांनी सागितले.