घरफोडी करणाऱ्यांना दोघांना चोवीस तासाच्या आत बेड्या, ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त
By राम शिनगारे | Published: September 18, 2022 07:36 PM2022-09-18T19:36:23+5:302022-09-18T19:36:31+5:30
न्यू बालाजीनगरमधील महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख १७ हजार रुपयांची चोरी केली होती.
औरंगाबाद : शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून १ लाख १७ हजार रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून चोरी केलेला ९७ हजार ३६३ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
शिवाजीनगर परिसरातील न्यू बालाजीनगर येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री लंपास केला होता. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकास ही घरफोडी काब्रानगर मधील अली खान व शेख अफरोज यांनी केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयीत आरोपी अली खान सत्तार खान (२०) व शेख अफरोज शेख गुलाब (२०, दोघे , रा. काब्रानगर, गारखेडा) यांना ताब्यात घेत चौकशी केली.
या चौकशीत त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच घरफोडीत चोरलेला मुद्देमालही अली खान याच्या घरातून जप्त करण्यात आला. या आरोपींना जप्त मुद्देमालासह पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. हा गुन्हा निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि मनोज शिंदे, हवालदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विलास मुठे, विशाल पाटील, रविंद्र खरात, रमेश गायकवाड यांच्या पथकाने २४ तासांच्या आत उघडकीस आणला आहे.