Aurangabad: औरंगाबाद ते पुणे फक्त सव्वा तासांत, नितीन गडकरींनी केली नवीन द्रुतगती मार्गाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 12:46 PM2022-04-24T12:46:52+5:302022-04-24T12:52:26+5:30
Aurangabad: "2024 पर्यंत औरंगाबादमध्ये 25000 कोटी रुपयांचे कामे पूर्ण करणार."
औरंगाबाद: भाजप नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते धुळे-सोलापूर हायवेसह विविध रस्त्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. दरम्यान, यावेळी नितीन गडकरींनी औरंगाबाद आणि मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात सर्वात मोठी घोषणा म्हणजे, नवीन औरंगाबाद-पुणे दुर्तगती महामार्ग. या सोहळ्याला औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद मेट्रोवर काम सुरू
आपल्या भाषणात नितीन गडकरींनी भाजपच्या कामांचा पाढा वाचला. तसेच, 2024 पर्यंत औरंगाबादमध्ये 25000 कोटी रुपयांचे कामे पूर्ण करणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. यावेळी त्यांनी औरंगाबादमध्ये भविष्यात मेट्रो येणार असल्याचेही सांगितले. यासाठी डीपीआर तयार असून, महामेट्रोकडून त्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, 2024 पर्यंत मराठवाड्यातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांप्रमाणे करणार असंही ते म्हणाले.
नवीन द्रुतगती मार्गाची घोषणा
औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती मार्गाची घोषणा गडकरींनी यावेळी केली. यासाठी 10,000 कोटींचा खर्च होणार आहे. बीड-नगर-पैठण या मार्गाने या रस्ता जाईल. त्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे, पुढच्या वेळेला आल्यावर याचे भूमिपूजन करणार, असंही ते म्हणाले. या नवीन रस्त्यामुळे औरंगाबाद ते पुणे अवघ्या सव्वा तासात पूर्ण होईल, अशीही माहिती त्यांनी दिली. याशिवाय, येत्या काळात रोप वे बाबात आम्ही सकारात्कमक असून, त्याबाबत प्रस्ताव द्या, आम्ही मंजूर करू, असेही त्यांनी मंचावर उपस्थित नेत्यांना म्हटले.
नितीन गडकरींच्या हस्ते या मार्गांचे लोकार्पण
नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 औरंगाबाद ते तेलवाडी या 3062 कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजनही केले. राष्ट्रीय महामार्ग 752 मधील औरंगाबाद ते पैठण चौपदरीकरण (42 किमी) या 1670 कोटींच्या रस्त्याचे भूमिपूजन केले जाईल. दौलताबाद टी पॉइंट ते माळीवाडा, माळीवाडा ते देवगाव रंगारी ते शिऊर 185 कोटींचा रस्ता, कसाबखेड्यापासून देवगाव रंगारी (10 किमी) एकूण (किंमत 47 कोटी) रस्त्याचेही भूमिपूजन केले.