औरंगाबादमध्ये १ ते ४० वयोगटातील रुग्ण अधिक मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 07:28 PM2020-06-12T19:28:40+5:302020-06-12T19:33:57+5:30
औरंगाबादेत दीड महिन्यापासून रोज कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. यात ५१ ते ८० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : औरंगाबादेत १ ते ४० वयोगटात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण या वयोगटातील आहेत. मात्र, सर्वाधिक रुग्ण असूनही या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. ज्येष्ठांनाच धोका का, कमी वयात मृत्यूचे प्रमाण कमी का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
औरंगाबादेत दीड महिन्यापासून रोज कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. यात ५१ ते ८० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी आहे. या वयोगटातील रुग्णसंख्या जवळपास २५ टक्के आहे; परंतु याच वयातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याउलट १ ते ४० वयाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असूनही, या वयोगटात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. शहरात बुधवारपर्यंत कोरोनाच्या १२१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ४० वर्षांखालील केवळ ९ रुग्णांचा समावेश आहे.
वयाच्या ४० वर्षांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोरोना व्हायरस या वयोगटातील व्यक्तींवर अधिक लवकर हल्ला करतो; परंतु तरुण, लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. सर्दी, खोकला यासारख्या समस्यांवर लहान मुले सहजपणे लढतात. त्यामुळे कोरोना व्हायरसचा तरुण आणि लहान मुलांवर परिणाम होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयात १२ वर्षांखालील ४८ मुले दाखल झाली होती. हे सर्व उपचार घेऊन घरी परतल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.
९०% मृत्यू ५० वर्षांवरील
समितीच्या माध्यमातून दर १५ दिवसांनी डेथ आॅडिट केले जाते. ९० टक्के मृत्यू हे ५० वर्षांवरील असल्याचे यातून समोर आले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर उपचार घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या.
वयोमानानुसार कोरोनाग्रस्तांचे प्रमाण
वय टक्केवारी
१ ते १० ७.१
११ ते २० ११.२
२१ ते ३० १९.५
३१ ते ४० २२.५
४१ ते ५० १४.२
५१ ते ६० १२.८
६१ ते ७० ८.९
७१ ते ८० ३.२
८० वरील ०.९