औरंगाबाद - पैठण रस्ता अखेर महामार्ग घोषित
By Admin | Published: March 17, 2016 12:18 AM2016-03-17T00:18:21+5:302016-03-17T00:22:13+5:30
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे (डीएमआयसी) अखेर औरंगाबाद - पैठण रस्त्याचे भाग्य उजळले आहे.
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे (डीएमआयसी) अखेर औरंगाबाद - पैठण रस्त्याचे भाग्य उजळले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याला महामार्गाचा दर्जा दिला आहे. पंतप्रधानांच्या ‘भारतमाला’ योजनेत या रस्त्याचा समावेश करण्यात आला असून, येत्या आॅक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
‘डीएमआयसी’अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या शेंद्रा-बिडकीन औद्योगिक पार्कच्या कामाला आता गती आली आहे. बिडकीनहून जाणाऱ्या औरंगाबाद-पैठण या रस्त्याचे भाग्यही यामुळे उजळले आहे. पंतप्रधानांच्या ‘भारतमाला’ योजनेत या रस्त्याचा समावेश करण्यात आला असून, महामार्गाचा दर्जाही देण्यात आला आहे.
महामार्ग प्राधिकरणाकडून औरंगाबाद - पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. अहवाल सादर करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रस्त्याच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातील. आॅक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) सहमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमकुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पैठण रस्त्याचे काम करतानाच बिडकीन - नगर रस्त्याचे कामही हाती घेतले जाईल.
यामुळे बिडकीनहून येणारी जड वाहने औरंगाबादला न येता परस्पर नगर रस्त्यावर जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.