परीक्षांमधील कॉपी रोखण्यासाठी येणार ‘औरंगाबाद पॅटर्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 02:31 PM2020-02-11T14:31:05+5:302020-02-11T14:36:50+5:30
पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी आता ‘औरंगाबाद पॅटर्न’ राबविण्यात येणार
- राम शिनगारे
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १८ फेब्रुवारीपासून बारावी आणि ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांमध्ये कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा दक्षता समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी आता ‘औरंगाबाद पॅटर्न’ राबविण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली. यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या नियंत्रणात तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
मंडळातर्फे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने वादग्रस्त परीक्षा केंद्रांना भेटी देत शेकडो विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडून कारवाई केली होती. सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील केंद्रातील ३२२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे धाडस केले होते. त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभागाने मागील वर्षभर कॉपी रोखण्यासाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम, कार्यशाळांच्या माध्यमातून समुपदेशन केले आहे. या त्यांच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी उदय चौधरी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. वर्षभर केलेल्या प्रयत्नांना परीक्षेच्या कालावधीत मूर्त स्वरूप देण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी परीक्षा केंद्र संचालक, मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी परीक्षा केंद्रांवर पालन करण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत. याशिवाय औरंगाबाद पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना पत्र पाठवून जबाबदारी निश्चित केली आहे. राज्यात पहिल्यांदाच तहसीलदार, नायब तहसीलदार यांना भरारी पथकांमध्ये सहभागी करून घेण्यात येत असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली. परीक्षेत होणारा कॉपीसारखा गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल विभागातील नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या नियंत्रणात प्रत्येक तालुक्यात यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या यंत्रणेच्या जोडीला पोलीस प्रशासन असणार आहे. यासाठी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या आठवड्यात त्या जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावणार आहेत. त्यामध्ये परीक्षा काळात सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या जाणार आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेत पहिल्यांदाच ‘औरंगाबाद पॅटर्न’ राबविण्यात येणार आहे.
आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचा पुढाकार
माध्यमिक शिक्षण विभागाने वर्षभर राबविलेल्या कॉपी रोखण्यासाठीच्या कार्यक्रमांना शहरातील आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आहे. यासाठी आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकाही पार पाडल्या आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या नेतृत्वात कॉपी रोखण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी शहर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी वेळोवेळी बैठकांना हजेरी लावली असून, आगामी काळातही सहकार्य करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय नवनियुक्त जिल्हा परिषदेचे सीईओ एम.एम. गोंदवले, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनाही या अभियानाची माहिती देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
वर्षभर राबविले जनजागृती अभियान
माध्यमिक शिक्षण विभागातर्फे वर्षभर कॉपी रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. तालुकास्तरावर मुख्याध्यापक, शिक्षक, पालकांचे मेळावे, कार्यशाळा घेऊन कॉपीचे धोके समजावून सांगितले. पोलीस, केंद्र संचालक, संस्थाचालकांच्या बैठक घेतल्या. त्यामध्ये कॉपीमुळे भविष्यातील पिढीचे नुकसान करीत असल्याचे सांगण्यात आले. इंग्रजी, गणित या विषयांवर अधिक लक्ष देण्यास सांगितले. त्यानंतर आता हे अभियान राबविण्यात येत असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
...............................