उद्योग-शिक्षण सहकार्याच्या ‘औरंगाबाद पॅटर्न’ ची देशाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:48 AM2018-01-23T00:48:50+5:302018-01-23T00:49:14+5:30
उद्योग-शिक्षण सहकार्याच्या या ‘औरंगाबाद पॅटर्न’ची देशाला गरज असल्याचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील उद्योगात कार्यरत संघटना आणि अभियांत्रिकी महाविद्यालये एकत्र येऊन ‘इंडस्ट्री
अकॅडेमिया एन्गेजमेंट समीट’ सारखे गुणवत्ता शोधणारे आणि संधी देणारे उपक्रम राबवतात, हे कौतुकास्पद आहे. उद्योग-शिक्षण सहकार्याच्या या ‘औरंगाबाद पॅटर्न’ची देशाला गरज असल्याचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगितले.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात मसिआ, जीआयझेड, मिनिस्ट्री आॅफ एमएसएमई आणि सीएसएमएसएसतर्फे इंडस्ट्री अकॅडेमिया एन्गेजमेंट समीट-२०१८ चे आयोजन केले होते. यात शहरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने (बाटू) राज्यातील एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला संलग्न होण्यासाठी आग्रह केला नाही. तरीही राज्यातील ७२ महाविद्यालयांनी संलग्नता स्वत:हून घेतली आहे. यात औरंगाबादेतील महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठाने परीक्षा पद्धती, मूल्यमापन आणि प्रत्यक्षिकांवर अधिक भर दिला आहे. या विद्यापीठातून निव्वळ कागदावर उत्कृष्ट असलेले अभियंते निर्माण करायचे नाहीत, तर प्रत्यक्षात कार्य करणारे अभियंते निर्माण केले जात असल्याचे कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनी सांगितले. या प्रकारचे अभियंते निर्माण करण्यासाठी शिक्षकांना तास संपल्यानंतर काम करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.