औरंगाबादेत पेट्रोल @ ८३, डिझेल ७0 रुपये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:19 PM2018-04-02T18:19:56+5:302018-04-02T18:23:03+5:30

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचा उच्चांक रविवारी नोंदविला गेला.

Aurangabad petrol @ 83, diesel 70 rupees | औरंगाबादेत पेट्रोल @ ८३, डिझेल ७0 रुपये 

औरंगाबादेत पेट्रोल @ ८३, डिझेल ७0 रुपये 

googlenewsNext

औरंगाबाद : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचा उच्चांक रविवारी नोंदविला गेला. पेट्रोल ८२.६६ पैैसे तर डिझेल ६९.८७ पैैसे प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहे. वाढत्या उन्हासोबतच महागाईचे चटकेही शहरवासीयांना सोसावे लागणार आहेत. 

मागील वर्षभरात पेट्रोलच्या भावात लिटरमागे १० रुपये, तर डिझेलच्या भावात ९ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मागील एका दिवसात पेट्रोल २६ पैैसे तर डिझेल २७ पैशांनी महागले. पॉवर पेट्रोल तर ८५ रुपयांच्या जवळपास जाऊन पोहोचले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या दराचा आढावा घेतात. सुरुवातीला काही दिवस भाव कमी झाले; पण त्यानंतर सतत भाव वाढतच आहेत. पेट्रोलपंपचालकांनी सांगितले की, १४ सप्टेंबर २०१४ नंतर पेट्रोलच्या दराने गाठलेला हा मोठा उच्चांक आहे. चार वर्षांपूर्वी शहरात पेट्रोलचे दर ७८ रुपये प्रतिलिटर होते.  या दरवाढीमुळे पुन्हा एकदा नव्याने महागाई उसळणार आहे. मालवाहतूकदार वाहतूकभाड्यात वाढ करण्याचा विचार करीत आहेत. 

दिल्ली-मुंबईच्या तुलनेत औरंगाबाद महाग 
दिल्ली-मुंबई शहर महागडे म्हणून ओळखले जाते; पण पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत या महानगरांपेक्षा अन्य शहर महाग आहेत. त्यात औरंगाबादचाही समावेश आहे. रविवारी उच्चांक गाठून दिल्लीत पेट्रोल ७४ रुपये, तर डिझेल ६५ रुपये व मुंबईत पेट्रोल ८१ रुपये, तर डिझेल ६८ रुपये प्रतिलिटर विकत होते. औरंगाबादेत मात्र, पेट्रोल ८२ रुपये ६६ पैैसे, तर डिझेल ६९.८७ रुपये प्रतिलिटर विकण्यात आले.

२० टक्क्यांनी मालवाहतूक भाडे वाढणार 
जीएसटीमध्ये पेट्रोल-डिझेलचा समावेश होणार होता तो झाला नाही. एप्रिलपासून दर कमी होतील अशी अपेक्षा होती; पण झाले उलटेच. डिझेलचे भाव पहिल्यांदाच ७० रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यामुळे मालवाहतुकीचे दर २० टक्क्यांपर्यंत वाढतील. 
-फय्याज खान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना

उद्योगाला बसणार फटका 
डिझेल भाववाढीचा फटका उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. मालवाहतूक खर्चात वाढ होते. यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. त्यात लहान उद्योजकांना याचा सर्वाधिक फटका बसतो. कारण, पेट्रोलियम प्रॉडक्टचेही भाव वाढून जातात. उत्पादन खर्च वाढतो व मालवाहतूक खर्चही वाढतो. मोठे उद्योजक जॉबच्या किमती लवकर वाढवून देत नाहीत. यामुळे लहान उद्योजकांना तारेवरची कसरत करावी लागते. 
-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआयए 

पेट्रोल-डिझेल जीएसटींतर्गत आणावे
पेट्रोल-डिझेलच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ८० टक्के मालवाहतूकही मालट्रकने केली जाते. परिणामी, मालवाहतुकीचे भाडे वाढेल. हेच महागाई बोकळण्याचे प्रमुख कारण ठरणार आहे. जीवनावश्यक वस्तू महागतील व अंतिम फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसेल. यासंदर्भात आम्ही संघटनेच्या वतीने जीएसटी कौन्सिलला पत्र लिहिणार आहोत. त्यात पेट्रोल-डिझेल जीएसटींतर्गत आणावे, अशी मागणी केली जाणार आहे. 
-प्रफुल्ल मालाणी, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स

Web Title: Aurangabad petrol @ 83, diesel 70 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.