औरंगाबादेत पेन्शनर्सची खासदारांच्या निवासासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 05:23 PM2018-07-09T17:23:24+5:302018-07-09T17:24:19+5:30
या पेन्शनर्सच्या न्यायासाठी संसदेत विषय मांडून न्याय द्या, या मागणीसाठी पेन्शनर्स संघटनेतर्फे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी आज धरणे आंदोलन केले.
औरंगाबाद : देशातील १८६ अस्थापनेवरील ९० लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कर्मचारी निवृत्ती योजना-९५ (ईपीएस) नुसार पेन्शन देण्यात येते. ही पेन्शन अवघी ५०० ते २२५० रूपयांपर्यंत आहे. या पैशामध्ये सेवानिवृत्तांची खर्चही भागणे शक्य नाही. या पेन्शनर्सच्या न्यायासाठी संसदेत विषय मांडून न्याय द्या, या मागणीसाठी पेन्शनर्स संघटनेतर्फे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी आज (दि.९) धरणे आंदोलन केले.
ईपीएस -95 निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समिती औरंगाबाद विभागातर्फे हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सराकराच्या कर्मचारी निवृत्त योजना ९५ नुसार सेवेतून निवृत्त झालेल्या देशभरातील १८६ अस्थापनावरील विविध कार्यालये, कंपन्या, उद्योगधंद्यातील ९० लाख कर्मचारी सेवानिवृत्त योजनेचा लाभ घेत आहेत. या कर्मचाऱ्यांना ईपीएस-९५ या योजनेनुसार दरमहा ५०० ते २२५० एवढी अतिशय तुटपुंजी पेन्शन मिळते. यामुळे या महागाईच्या काळात निवृत्त ज्येष्ठ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह महिनाभर होऊ शकत नाही.
यासाठी १ एप्रिल २०१४ पासून महागाई भत्त्यात किमान साडेसात हजार रुपये पेन्शन सुरु व्हावे यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार म्हणून जिल्ह्यातील ५६ हजार निवृत्त ईपीएस-९५ कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी संसदेत अधिवेशनाच्या काळात उपस्थित करावा मांडाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याविषयीचे निवेदन खासदार चंद्रकांत खैरे यांना देण्यात आले. या आंदोलनात समन्वय समितीचे अॅड. सुभाष देवकर, डॉ. प्रदीप कुलकर्णी यांच्या नेतत्वात आंदोलन करण्यात आले.