औरंगाबादेत प्लास्टिक विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:59 PM2018-03-24T16:59:35+5:302018-03-24T20:11:21+5:30

राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे.  यानुसार प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संतापलेल्या विक्रेत्यांनी आजपासूनच आपल्या दुकानी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

In Aurangabad, the plastic vendors started uninterrupted | औरंगाबादेत प्लास्टिक विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरु 

औरंगाबादेत प्लास्टिक विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरु 

googlenewsNext

औरंगाबाद : राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे.  यानुसार प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संतापलेल्या विक्रेत्यांनी आजपासूनच आपल्या दुकानी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर आद्योगिक वसाहतीत पॉलीमर उत्पादन करणार्‍या ३०० पेक्षा अधिक उद्योगही उत्पादन बंद ठेवण्याचा विचारात आहेत. 

राज्यात २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून प्लास्टिक  तसेच थर्माकोलवर बंदी आणण्यात आली. आज सकाळी ही वार्ता सर्वत्र पसरली. शहरातील व्यापार्‍यांच्या व्हॉटस्अपवरही शासनाच्या अधिसूचनेची प्रत व्हायरल झाली होती. यामुळे संतापलेल्या विक्रेत्यांनी आपली दुकाने उघडलीच नाही. प्रत्येक दुकानावर बेमुदत बंदचे फलक लावण्यात आले होते. ‘डोकं फिरल या सरकारचे महाराष्ट्र शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीचा कठोर निर्णय घेतला त्याच्या निषेधार्थ बेमुदत बंद’ असे फलकावर लिहिण्यात आले होते. मोंढ्या येथील मोतीकारंज्या परिसरात सर्व प्लास्टिक विक्रेते एकवटले होते.

प्लास्टिक शॉप असोसिएशनचे सचिव शेख नाजीम यांनी सांगितले की, शहारात आजघडीला ५०  लहान-मोठे प्लास्टिकचे होलसेलर आहेत व सुमारे ३०० फेरीवाले प्लास्टिक विकतात. दररोज १५ लाखाची उलाढाल होते. यावर आधारीत १८०० परिवार बेरोजगार होणार आहे. तसेच मिठाई, बेकरी,गृहउद्योग,तेलउद्योग, कपडा, रेडिमेड,होजअरी, फुड पॅकिंग आदी व्यवसायावरही मोठा फरक पडणार आहे. २००६ च्या नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या करिबॅग विक्रीवर बंद आहे. त्याची आम्ही अंमलबजावणी करीत आहोत. मात्र, संपूर्ण प्लास्टिक बंदी हे योग्य  नाही.  महिनाभरात शिल्लक प्लास्टिक परराज्यात विक्रीचे आदेश देण्यात आले आहे. याविरोधात आम्ही बेमुदत बंद पुकारला असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व प्लास्टिक होलसेलर हजर होते. 

कर्ज माफ करा नसता इच्छा मरण द्या 
कोणताही पर्याय न देता सरकारने प्लास्टिक बंदी आणली आहे. होलसेल विक्रेत्यांनी या व्यवसायासाठी बँकेचे कर्ज काढले आहे. अनेकांचे पाल्य आज इंजिनिअरींग, मेडिकल आदी उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांचे लग्न करायचे आहे. अशा परिस्थिती जर व्यवसाय बंद पडला तर बँकेचे कर्ज भरणार कुठून. सरकारने शेतकर्‍यांप्रमाणे आमचेही कर्ज माफ करावे नसता आमच्या संपूर्ण परिवारांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी.
- ओमप्रकाश भुतडा, अध्यक्ष, औरंगाबाद प्लास्टिक शॉप असोसिएशन

Web Title: In Aurangabad, the plastic vendors started uninterrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.