औरंगाबादमध्ये पोलीस उपायुक्तावर दाखल झाला बलात्काराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 07:15 AM2018-06-28T07:15:19+5:302018-06-28T07:15:48+5:30
तरुणीचे फसवणुकीने लैंगिक शोषण
औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीचे पोलीस उपायुक्ताने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तिला जिवे मारण्याची धमकीही दिल्याप्रकरणी पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरोधात मंगळवारी गुन्हा नोंदविण्यात आला. पीडित मुलीने आयुक्तालयाच्या व्हॉट्सअॅपवर अधिकाºयाविरोधात तक्रार केली होती.
पीडित मुलगी सुशिक्षित बेरोजगार आहे. स्पर्धा परीक्षेची ती तयारी करीत आहे. फेब्रुवारीत उपायुक्त श्रीरामे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला मार्गदर्शन करण्याची तयारी दाखविली. तिला घरी बोलावून पोलीस कर्मचारी म्हणून नोकरी देतो, असे आमिष दाखवून चार ते पाच वेळा शारीरिक संबंध ठेवले. नंतर ते तरुणीला भेटण्यास टाळाटाळ करू लागले. श्रीरामे यांनी फसवणूक केल्याच लक्षात येताच तिने तक्रार देईन, असे सांगितले. श्रीरामे यांनी ८ जून रोजी तिला पुन्हा घरी बोलावून शिवीगाळ करून मारहाण केली. पोलीस अधिकाऱ्यांकडून महिलांवर होणाºया अत्याचाराची प्रकरणे चव्हाट्यावर येण्याची ही औरंगाबादची पहिलीच घटना नाही. २००५ मध्ये तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षकाचा समावेश असलेले अत्याचाराचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर २०१२ मध्ये तत्कालीन सहायक पोलीस आयुक्तांविरोधात एका महिला पोलिसाने लैंगिक छळाची तक्रार केली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात अधिकाºयाची न्यायालय आणि खातेनिहाय चौकशीतून मुक्तता झाली.