औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी घेतली विशेष शाखेची ‘खबर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:18 PM2018-03-21T12:18:46+5:302018-03-21T12:20:16+5:30
शहरात कुठे काय शिजत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात या विशेष शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या शाखेतील अधिकारी व कर्मचारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत.
औरंगाबाद : ‘पोलिसांचा तिसरा डोळा’ अशी कधी काळी ओळख असलेल्या विशेष शाखेला अनेक घटनांची कुणकुणच लागत नाही. शहरात कुठे काय शिजत आहे, याचा कानोसा घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात या विशेष शाखेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या शाखेतील अधिकारी व कर्मचारी निव्वळ कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी या शाखेची चांगलीच ‘खबर’ घेतली.
पत्रकारांसोबत दुपारी गप्पा मारताना मिलिंद भारंबे यांनी नमूद केले की, शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी विशेष शाखा आणि सुरक्षा शाखेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शहरात कुठे हिंसात्मक घटना घडेत आहेत, याची सर्वात अगोदर माहिती याच विभागांना असायला हवी. कोरेगाव-भीमा आणि मिटमिटा येथील घटनांवरून या दोन्ही शाखा अपयशी असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या निष्क्रियतेचे परिणाम शहराला भोगावे लागत आहेत. या विभागांनीच सर्वप्रथम आम्हाला माहिती देणे अपेक्षित असते. पोलिसांकडून ज्या पद्धतीने सतर्कता बाळगायला हवी तशी बाळगण्यात आलेली नाही. शहरात कचराकोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. राजकीय मंडळींच्या हालचालींवर कडक नजर ठेवायला हवी. पोलीस कर्मचारी फक्त कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत.
पैठण रोडवर कांचनवाडी येथे दगडफेक, मिटमिटा येथील दंगलीची अगोदर माहिती पोलिसांना हवी होती. विशेष शाखा आणि सुरक्षा शाखेला आपली मरगळ दूर झटकून पुन्हा जोमाने कामाला लागा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, असे होता कामा नये, अशा सूचनाही देण्यात आल्याचे भारंबे यांनी नमूद केले.