औरंगाबाद पोलीस आयुक्त यादवांचे गॉडफादर रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:29 AM2018-03-16T00:29:06+5:302018-03-16T00:29:13+5:30
पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची ठाण्याहून औरंगाबादेत बदली करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गेल्या वर्षी १ एप्रिल २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. त्यानंतर २० दिवसांनी यादव औरंगाबादेत रुजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळाला वर्षपूर्ती होण्यापूर्वी त्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची ठाण्याहून औरंगाबादेत बदली करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी गेल्या वर्षी १ एप्रिल २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते. त्यानंतर २० दिवसांनी यादव औरंगाबादेत रुजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळाला वर्षपूर्ती होण्यापूर्वी त्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले आहे. वर्षपूर्ती होण्यापूर्वीच सक्तीच्या रजेवर जाण्याची नामुष्की ओढावल्यामुळे यादव बदली करून घेण्यासाठीच प्रयत्न करणार आहेत. आता त्यांना दानवे इच्छितस्थळी बदलीसाठी पुन्हा पत्र देणार काय? अशी चर्चा पोलीस आणि राजकीय वर्तुळातून कानावर येत आहे.
खा. दानवे यांनी गेल्या वर्षी दिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री सचिवालय आवक-जावकीच्या क्रमांकासह गृहमंत्रालयातील जबाबदार अधिकाऱ्यांच्या स्वाक्षºया होत्या. प्रशासकीय बदल्यांमध्ये राजकीय ढवळाढवळ कोणत्या स्तरावर आणि कशा प्रमाणात सुरू आहे, यावरून खा. दानवेंनी दिलेले ते पत्र गेल्या वर्षी चांगलेच गाजले होते. ठाणेकर यादव जेव्हा औरंगाबादेत आले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना नियमित खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री शहरात आले, त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज यादवांनी लावून त्यांना सलामी देण्याचा प्रयत्न केला. खाकीतील ही प्रसिद्धी अनेकांच्या नजरेत आली. त्यामुळे माध्यमातून त्यांच्यावर सडकून टीकाही झाली.
कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या वेळी यादव आऊट आॅफ कंट्री होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांची रजा रद्द करून त्यांना ई-मेलद्वारे औरंगाबादेत तातडीने दाखल होण्याचे आदेश दिले होते. दरम्यान या सगळ्याप्रकरणी खा. दानवे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
बदल्यांमध्ये ढवळाढवळ
बदल्यांमध्ये राजकीय ढवळाढवळ करून घेण्यात गृहखाते आघाडीवर नाहीये. महसूल प्रशासनात देखील वरिष्ठांपासून साध्या तलाठ्याच्या बदलीपर्यंत दबावतंत्राचे राजकारण सुरू आहे. चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या तलाठ्यावर बदलीची कारवाई करण्यासाठी प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला, तर त्यासाठी थेट आमदारांकडून प्रशासनावर दबाव येतो आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे प्रशासकीय शिस्तीवर होतो आहे.
प्रभारी आयुक्तपदी
मिलिंद भारंबे
औरंगाबाद : मिटमिटाप्रकरणी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी प्रभारी पोलीस आयुक्ताचा पदभार सांभाळला आहे.
मागील काही महिन्यात थोड्या-थोड्या कारणाने शहर संवेदनशील बनले आहे. मागील काही दिवसांपासून कचराकोंडीमुळे शहरवासीयांचीच नव्हे तर पोलीस विभागाचीही झोप उडाली आहे. कोणत्याहीक्षणी कायदा- सुव्यवस्था भंग होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्या खांद्यावर मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसोबत आता शहर आयुक्तालयाची जबाबदारी आली आहे. गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतला. रात्री त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन अधिकाºयांना सूचना दिल्या. पुण्यातील भीमा कोरेगावच्या घटनेनंतर शहरात १ ते २ जानेवारीदरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक, जाळपोळ व तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीही पोलीस आयुक्त यशस्वी यादव रजेवर होते. तेव्हाही भारंबे यांनी शहराची परिस्थिती नियंत्रणात आणली होती.