Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांकडून पर्यायी जागेचा प्रस्ताव; चेंडू आता मनसेच्या कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:24 PM2022-04-21T12:24:15+5:302022-04-21T12:24:31+5:30
मराठवाडा सांस्कृतिक मैदानात सभा घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही.
औरंगाबाद: मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी भोंग्यावरून राजकीय रान उठविले असून त्या पार्श्वभूमीवर येथे १ मे रोजी आयोजित केलेल्या जाहीर सभेवरून निर्माण झालेल्या वादंगाने बुधवारी वावटळीचे रूप धारण केले. सभा घेऊ नये यासाठी येणाऱ्या निवेदनांची संख्या वाढत असतानाच मनसे पदाधिकारी मात्र सभा घेण्यावर ठाम आहेत.
मराठवाडा सांस्कृतिक मैदानात सभा घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. मात्र औरंगाबाद पोलिसांनी पर्यायी जागेचा प्रस्ताव मनसेसमोर ठेवला आहे. राज ठाकरेंची सभा गरवारे स्टेडियमवर घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मात्र मनसे ठरलेल्या ठिकाणीच सभा घेण्यास आग्रही आहे. तसेच मनसेकडून या सभेला उपस्थित राहण्यासाठी सोशल मीडियावर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
दरम्यान, चार ते पाच संघटनांनी निवेदने देऊन राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यानंतर बुधवारी अ. भा. सेनेचे महेंद्र साळवे, सतीश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन सामाजिक शांतता अबाधित राहण्यासाठी सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.
औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील- गृहमंत्री वळसे पाटील
राज ठाकरे हे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांनी यासंदर्भात घोषणाही केली होती. परंतु त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह काही जणांकडून करण्यात आली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, अशा प्रकारची कोणतीही निवेदनं गृहखात्याकडे आलेलं नाही. ती औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे आली आहे. ते परिस्थिती पाहूनच निर्णय घेतील, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
...तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा
राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला परवानगी दिल्यास भारिप तथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा नेते सुमित भुईगळ यांनी दिला आहे.