औरंगाबाद पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:08 PM2018-06-19T14:08:47+5:302018-06-19T14:09:38+5:30
शाळा-महाविद्यालयीन मुली, महिलांची छेड काढणारे आणि पोलिसांच्या पारदर्शक व्यवहाराचे आता थेट चित्रीकरणच होणार असून, त्यासाठी शहर पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरे बसविले जात आहे.
औरंगाबाद : शाळा-महाविद्यालयीन मुली, महिलांची छेड काढणारे आणि पोलिसांच्या पारदर्शक व्यवहाराचे आता थेट चित्रीकरणच होणार असून, त्यासाठी शहर पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरे बसविले जात आहे. पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेले २४ कॅमेरे वाहतूक पोलीस, दामिनी पथकांसोबतच पोलीस ठाण्यातील निवडक पोलिसांना देण्यात आले.
पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले की, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी येथे रुजू झाल्यानंतर महिला सुरक्षा आणि पोलिसांच्या पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिले. शाळा-महाविद्यालये आता सुरू झाली आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन मुलींची छेड काढणारे काही टोळके जागोजागी बसलेले असतात. अशांवर कारवाई करण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्तीवर असतात. त्यांना कारवाईसाठी हे कॅमेरे दिले आहेत. यासोबतच नियम मोडून वाहने पळविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर पोलीस कारवाईसाठी सरसावतात, अनेकदा वाहनचालक पोलिसांच्या कारवाईला विरोध करतात. एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत हुज्जत घालून अरेरावीची भाषा वापरतात, बऱ्याचदा पोलिसांना धक्काबुक्कीही केली जाते, अशा घटना आता पोलिसांच्या खांद्यावरील कॅमेऱ्यांत कैद होणार आहेत.
पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरा लावल्याचे समाजकंटकांना समजल्यानंतर ते सुद्धा भीतीपोटी असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत. शिवाय पोलिसांचे काम अत्यंत पारदर्शक असावे, पोलीस घटनास्थळी पोहोचतात, तेव्हा या कॅमेऱ्यातून घटना स्थळाचे, तेथे उपस्थित लोकांचे शूटिंग होईल, हे छायाचित्रण पुरावा म्हणून पोलिसांना वापरता येईल. सध्या २४ स्पाय कॅमेरे उपलब्ध झाले आहेत. यापैकी सहा कॅमेरे वाहतूक शाखेला देण्यात आले. तसेच उर्वरित कॅमेरे विविध पोलीस ठाण्यांना आणि महिला सुरक्षा पथकांना वाटप करण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यांतर्गत प्राप्त कॅमेऱ्यांचा परिणाम दिसल्यानंतर आणखी कॅमेरे मागविण्यात येणार आहेत.