औरंगाबाद पोलिसांनी चोरट्यांकडून १९ दुचाकी केल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 03:56 PM2019-07-01T15:56:51+5:302019-07-01T15:59:02+5:30
शहर , ग्रामीण आणि जालना जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
औरंगाबाद: शहर , ग्रामीण आणि जालना जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी सिडको पोलिसांनीअटक केली. पोलिसांनी या दुचाकीचोराकडुन तब्बल १९ मोटारसायकल जप्त केल्या. अशोक मानसिंग तामचीकर आणि प्रदीप बाबुराव जाधव अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त डॉक्टर राहुल खाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, नारेगाव येथील रहिवाशी अशोक तामचीकर उर्फ महाराज याच्याकडे चोरीच्या दुचाकी आहेत अशी माहिती खबर्याने पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना दिली. माहिती मिळताच एमआयडीसी सिडको ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराज उर्फ अशोक याला संशयावरून ताब्यात घेतले, त्यावेळी त्याच्याजवळ एक दुचाकी होती. या दुचाकीबद्दल पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सुरवातीला महाराज उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
मात्र, पोलिसांनी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याच्या जवळील दुचाकी त्याने चौधरी कॉलनीतून चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे विविध नंबर प्लेट्स आणि आणखी एक चोरीची दुचाकी आढळली. यामुळे संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी त्याला ठाण्यात नेऊन कसून चौकशी केली. तेंव्हा त्याने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. विविध ठिकाणाहून चोरलेल्या दुचाकी तो चार ते पाच हजार रुपयात विक्री करीत होता. दुचाकी चोरण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी आरोपी प्रदीप जाधव हा त्याला मदत करीत. वाहन विक्रीतून मिळालेले पैसे ते हॉटेलमध्ये दारू पिऊन जेवणावर उडवीत. त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील चोरलेल्या दुचाकी जालना जिल्ह्यात विक्री केल्या तर जालना जिल्ह्यात आणि शहरात चोरलेल्या मोटर सायकल औरंगाबाद ग्रामीण भागात विक्री केल्याचे सांगितले.
यानंतर खरेदीदारांची नावे आणि पत्ते देखील पोलिसांना दिली. पोलिसांनी औरंगाबाद तालुक्यातील नायगव्हाण, हातमाळी, लाडसांगवी, वरझडी तसेच जालना जिल्ह्यातील राजुर आदी ठिकाणाहून तब्बल एकोणवीस मोटारसायकली जप्त केल्या. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल खाडे ,सहाय्यक आयुक्त गुणाजी सावंत सुरेंद्र माळाले, उपनिरीक्षक ताहेर पटेल ,सुरेश जारवाल ,कर्मचारी मुनीर पठाण, कोलते , शाहेद शेख, गणेश राजपूत ,दीपक शिंदे, नितेश सुंदरडे आणि भुतकर यांनी केली.