औरंगाबाद पोलीस ठाण्यात नाही सचिन अंदुरेची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:59 AM2018-08-20T00:59:59+5:302018-08-20T01:00:21+5:30
अटकेनंतर नेले मुंबईला; प्रतिक्रिया देण्यास पोलीस आयुक्तांचा नकार
औरंगाबाद : सचिन अंदुरेचे घर सिटीचौक ठाण्याच्या हद्दीत, तर त्याच्या कामाचे ठिकाण क्रांतीचौक ठाण्याच्या हद्दीत आहे. त्याला १४ आॅगस्टला एटीएसने ताब्यात घेताना क्रांतीचौक ठाण्यात बोलावले होते. सीबीआयने मात्र त्याला १६ आॅगस्टला उचलल्यानंतर थेट मुंबईला नेले. त्याची नोंद मात्र त्यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात केली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सचिनच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
सचिन समजून आधी दुसऱ्यालाच उचलले
१४ आॅगस्टला सचिनच्या अटकेसाठी आलेल्या मुंबई एटीएसच्या अधिकाºयांनी सचिनच्या दुकान मालकाचा मुलगा दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर एका हॉटेलवरील मुलाला हाच सचिन का, असे विचारले. त्याने हो म्हटले आणि अधिकाºयांनी दुकान मालकाच्या मुलालाच बळजबरीने त्यांच्या गाडीत कोंबले. मात्र, चूक लक्षात येताच एटीएसने त्याला पुन्हा दुकानासमोर सोडले. सचिन १० वर्षांपासून अकाऊंटंट म्हणून काम करतो. त्याला दरमहा पंधरा हजार रुपये महिना मिळतो, शिवाय तो अन्य काही लोकांचीही अकाऊंटची कामे करतो. त्यामुळे त्याला अतिरिक्त मोबदला मिळतो. सचिन कधीच रजा घेत नव्हता आणि दांडी मारत नव्हता. तो धार्मिक आणि कडवा हिंदुत्ववादी आहे. त्याच्यावर संशय येईल, अशी त्याची वर्तणूक आढळली नाही. त्याला कशाच्या आधारे सीबीआयने अटक केली, असा सवाल दुकान मालक दिलीप साबू यांनी केला.
सचिनचे कुटुंबीय तीन पिढ्यांपासून औरंगाबादेत
सचिनचे कुटुंब तीन पिढ्यांपासून औरंगाबादेतील धावणी मोहल्ला येथे भाड्याने राहतात. त्याचे वडीलसुद्धा मुनीम म्हणून काम करीत. सचिनचे बालवाडी ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण शहरातच झाले. सचिनचा आंतरजातीय प्रेमविवाह दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने झाल्याचे त्याचे सासरे सूर्यकांत सुरळे यांनी सांगितले. एटीएसने ज्ञानेश्वरनगर भागातील एका बंगल्यामध्ये सनातनच्या कार्यकर्त्याच्या वास्तव्याप्रकरणी माहिती घेतल्याचे समजते.
चौकशी करतो म्हणून नेले : शीतल अंदुरे
१४ आॅगस्टला एटीएसच्या अधिकाºयांनी औरंगाबादेत येऊन सचिनला ताब्यात घेतले. दोन ते अडीच तास आमच्या घराची झडती घेतली. घरातील कागदपत्रे, बँक खात्याचे पासबुक आदी कागदपत्रे जप्त करून एटीएसने सचिनला मुंबईला नेले होते. त्यांचा मोठा भाऊ प्रवीणही त्यांच्यासोबत गेला होता. तेथे दोन दिवस चौकशी केल्यानंतर सचिनला औरंगपुºयातील सासुरवाडीत आणून सोडले. सचिनची चौकशी पूर्ण झाली, त्याला आम्ही आणून सोडले, असे सांगून अधिकारी तेथून निघून गेले.
त्यानंतर अर्ध्या तासाने सीबीआयचे एम.एस. पाटील आणि अन्य अधिकारी आले आणि त्यांनी सचिनला चौकशीसाठी मुंबईला नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर अटक केल्याचीच बातमी टीव्हीवर पाहिली, असे सचिनची पत्नी शीतल अंदुरे यांनी सांगितले.
त्यानंतर सचिनला फोन केला तेव्हा त्यांनी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. सीबीआयला २० आॅगस्टपूर्वी अटक दाखवायची होती, असा आरोप शीतल यांनी केला.