औरंगाबाद : तंबीमुळे अतिक्रमण हटावचे ढोंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:58 PM2018-04-04T23:58:36+5:302018-04-05T00:00:46+5:30
शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर पन्नास टक्क्यांहून अधिक अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांकडे आजपर्यंत डोळेझाक करण्याचे काम मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर पन्नास टक्क्यांहून अधिक अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांकडे आजपर्यंत डोळेझाक करण्याचे काम मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने केले. या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर ‘वसुली’त मग्न असतात. हे काम संपल्यावर कार्यालयात थंडगार कूलर लावून हवा खाण्याचे काम करतात. बुधवारी मनपा पदाधिकाऱ्यांनी या विभागाची चिरफाड करून कामाला लावले. त्यानंतर पथकाने दिल्लीगेट येथील फर्निचर विक्रेते, पैठणगेट येथील हातगाड्यांवर कारवाईचा बडगा उगारला.
शहरातील कोणत्याही रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी दुचाकी वाहन चालविणे अवघड झाले आहे. चारचाकी वाहनधारकांना शहरात वाहन चालवायचे असेल तर पहिल्या आणि दुसºया गिअरमध्येच वाहन चालवावे लागते. प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजंूनी अतिक्रमणे झाली आहेत. शहरात महापालिका आहे किंवा नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहागंज, सिटीचौक, मछली खडक, रंगारगल्ली, कुंभारवाडा, औरंगपुरा, मध्यवर्ती बसस्थानक, टी. व्ही. सेंटर, आविष्कार कॉलनी, गजानन महाराज मंदिर रोड, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, रोशनगेट, चंपाचौक, लोटाकारंजा आदी अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शहरातील अतिक्रमणांबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. बुधवारी शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी शिष्टमंडळासह महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन अतिक्रमणे हटविली जात नसल्याबंद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संतप्त घोडेले आणि सभागृह नेते विकास जैन यांनी प्रशासकीय विभागात धाव घेतली. याठिकाणी अधिकारी-कर्मचारी चक्क कूलर आणि पंख्यांची थंड हवा खात बसले होते. त्यांना टप्पा क्रमांक दोनच्या इमारतीच्या मोकळ्या जागेत बोलविण्यात आले. कर्मचारी-अधिकारी आता कार्यालयात थांबणार नाही. सर्वांनी मोहिमेवर जाऊन अतिक्रमणे हटवावीत. कारवाई करणार नाही, तोपर्यंत परत फिरू नये, अशी तंबी त्यांना देण्यात आली.
पथकाची दिखाऊगिरी
१५ पोलीस, १३ इमारत निरीक्षक, दोन प्रशासकीय अधिकाºयांसह अतिक्रमण हटाव विभागाचा ताफा महापालिका कार्यालयाबाहेर पडला. दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यात दिल्लीगेट ते रोजेबाग रस्त्यावरील जुने फर्निचर जप्त करण्यात आले. सहा गाड्या भरून जुने फर्निचर जप्त करण्यात आले. पैठणगेट ते सिटीचौक रस्त्यावरील १२ हातगाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले.