औरंगाबादेत उद्योगांची उत्पादन क्षमता घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:02 AM2021-04-20T04:02:51+5:302021-04-20T04:02:51+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्योगनगरी धास्तावलेली असून, सध्या उत्पादन क्षमतेवरही मोठा परिणाम झालेला आहे. मागील १५ ते २० ...
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्योगनगरी धास्तावलेली असून, सध्या उत्पादन क्षमतेवरही मोठा परिणाम झालेला आहे. मागील १५ ते २० दिवसांपूर्वी ८५ टक्के उत्पादन क्षमतेने सुरू असलेले उद्योग सध्या ५० ते ६० टक्क्यांवर आले आहेत. कोरोनासंबंधीच्या सर्व उपाययोजना व खबरदारी घेत कंपन्या सुरू आहेत.
यासंदर्भात ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष रमण अजगावकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली व झपाट्याने बाधित रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला ही लाट थोपविण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यासाठी पाऊल उचलावे लागले. चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. ४५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लसीकरण सक्तीचे करण्यात आले. त्यानुसार उद्योगांतील कामगारांचे सातत्याने कोरोना चाचणी करण्यात येत असून, बऱ्याच जणांनी लसीकरणही करून घेतलेले आहे. परिणामी, आजघडीला शहरातील बाधित रुग्णांची संख्या बऱ्यापैकी कमी होताना दिसत आहे. प्रामुख्याने वाळूज औद्योगिक क्षेत्रात बाधित रुग्णांचे प्रमाण अवघे दीड टक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तथापि, उद्योगांत २० हजार परप्रांतीय कामगार काम करत होते. त्यापैकी ६० ते ७० परप्रांतीय कामगार मोठा लॉकडाऊन लागला, तर येथेच अडकून बसावे लागेल, या भीतीने गावी परतले आहेत. दुसरीकडे, बरेच स्थानिक कामगारही कमी झाले असून, कंपनीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, या भीतीपोटी नवीन कामगारांना कामावर घेण्यास उद्योजक धजावत नाहीत. याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर झाला आहे.
सध्या अनेक कंपन्या ५० ते ६० टक्के कामगार वर्गावरच सुरू आहेत. उत्पादनासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञ, कुशल मनुष्यबळ व काही परप्रांतीय कामगारांची कंपनीतच निवास, भोजनाची व्यवस्था केली करण्यात आलेली आहे.
चौकट............
‘मासिआ’तर्फे लसीकरण सुरू
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत ‘मासिआ’ या उद्योग संघटनेच्या कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजेपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या या लसीकरण शिबिरात आज पहिल्या दिवशी १०० ते १५० जणांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही औद्योगिक वसाहतीतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, संचालक याठिकाणी लस घेऊ शकतात. वाळूज औद्योगिक वसाहतीत शासकीय आरोग्य यंत्रणेची कमतरता असल्यामुळे तिथे तयारी असतानाही सध्या तरी लसीकरण शिबिर घेणे शक्य नाही. पण, याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले.