'औरंगाबाद-पुणे' पाच तासांच्या प्रवासासाठी लागले दहा तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 03:16 PM2019-09-04T15:16:10+5:302019-09-04T15:19:36+5:30
शिवशाही बसच्या ४० प्रवाशांची गैरसोय
औरंगाबाद : औरंगाबादहून पुण्याचा प्रवास साधारणत: पाच ते साडेपाच तासांचा आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने सोमवारी (दि. २) रात्री प्रवास करणाऱ्या ४० प्रवाशांना ढिसाळ कारभारामुळे पुण्याला जाण्यासाठी तब्बल दहा तास लागले.
मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी रात्री १०.४५ वाजेच्या औरंगाबाद-पुणे शिवशाही बससाठी जवळपास ४० प्रवाशांची बुकिंग होती. मात्र, ही बस रात्री ११.३० वाजता आली. त्यानंतर ही बस रवाना झाली. बस वाळूज परिसरातील टोलनाक्यापर्यंत येत नाही, तोच बसमधील वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त झाला. परिणामी, बसमध्ये दमट वातावरण झाले. त्यामुळे ही बस रस्त्यावर थांबविण्यात आली. बसचालकाने अन्य बस बोलाविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. या सगळ्यात तासभर उलटून गेला. त्यामुळे अखेर ही बस पुन्हा मागे वळवून बसस्थानकात आणण्यात आली. रात्री १२ वाजता ही बस मध्यवर्ती बसस्थानकात दाखल झाली. याठिकाणी चालकाने नियंत्रण कक्षात अन्य बस देण्याची मागणी केली; परंतु पुणे आगाराची आणि कंत्राटावरील बस असल्याने अन्य बस देण्याकडे दुर्लक्ष केले. अखेर रात्री अडीच वाजेच्या सुमारास अन्य बस मिळाली. त्यातून हे प्रवासी पुण्याला रवाना झाले. नियोजित प्रवासाप्रमाणे प्रवासी पुण्याला पहाटे साधारण ४.३० वाजता पोहोचणे अपेक्षित होते; परंतु सकाळी ९ वाजता प्रवासी पुण्यात दाखल झाले. आगार व्यवस्थापक एस. ए. शिंदे म्हणाले, शिवशाहीची जबाबदारी ही कंत्राटदारावरच आहे; परंतु याविषयी काही माहिती प्राप्त नाही.
चालकाने प्रयत्न केले
या बसमधून प्रवास करणारे व्ही. देशमुख म्हणाले, वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त आणि त्यानंतर झालेल्या प्रकाराने पाच तास उशिराने पुण्यात पोहोचलो. चालकाने प्रयत्न केले; परंतु बसस्थानकातील कर्मचाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.