औरंगाबादमध्ये २२५० ग्राहकांची वीज कापली; एका दिवसात झाली २ कोटीची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:30 PM2018-11-26T13:30:00+5:302018-11-26T13:33:00+5:30
महावितरणने थकीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे.
औरंगाबाद : महावितरणने थकीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. वसुलीसाठी या मोहिमेत शनिवारी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले. दरम्यान, औरंगाबाद परिमंडळातील २ हजार २७० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याचबरोबर शनिवारी एकाच दिवशी दोन कोटींहून अधिक वसुली झाली. ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे.
वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही मंडळांत थकीत वीजबिलांचे प्रमाण जास्त आहे. थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे स्वत: शनिवारी मोहिमेत सहभागी झाले. त्यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, क्षेत्रीय अभियंत्यांनी वसुली व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविली.
मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी जालना शहरात २० व्यावसायिक व ५ औद्योगिक थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर थकीत वीजबिले भरण्यासाठी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला.
थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहिल. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी वीजबिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
एकाच दिवशी २ कोटी १८ लाख ३६ हजार रुपये वसूल
औरंगाबाद शहर मंडळात ४४६, औरंगाबाद ग्रामीण मंडळात १३०७, तर जालना मंडळात ५१७ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या मोहिमेत एका दिवसात औरंगाबाद शहर मंडळांतर्गत १ कोटी ३२ लाख ७७ हजार ४४ रुपये, औरंगाबाद ग्रामीण मंडळांतर्गत ५२ लाख ७४ हजार ९७० रुपये. तर जालना मंडळात ३२ लाख ८४ हजार १८२ रुपये वसूल झाले. औरंगाबाद परिमंडळांतर्गत एकूण २ कोटी १८ लाख ३६ हजार १९६ रुपये वसूल झाले.