औरंगाबादच राहिले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:22 PM2019-06-28T13:22:42+5:302019-06-28T13:26:56+5:30

मराठा क्रांती मोर्चाची स्थापना आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ ऐतिहासिक घोषणा औरंगाबादेतच झाली

Aurangabad remained at the center of the movement for the Maratha reservation | औरंगाबादच राहिले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी

औरंगाबादच राहिले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्याच मराठा क्रांती मूकमोर्चाने दिली राज्याला दिशा ३४ महिन्यांनंतर समाजाच्या लढ्याला कायदेशीर यश

औरंगाबाद : कोपर्डीच्या दुर्दैवी घटनेनंतर १ ते ९ आॅगस्ट २०१६ पर्यंत जगाला शिस्तीचे दर्शन घडविणाऱ्या आणि समाजाची एकजूट करणाऱ्या ‘मराठा क्रांती मूकमोर्चा’ची बीजे औरंगाबाद शहरात रोवली गेली. तब्बल ३४ महिन्यांनंतर समाजाच्या आक्रोशाला, लढ्याला यश मिळाले असून, खऱ्या अर्थाने समाजाच्या एकजुटीचा हा विजय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कोपर्डीतील घटनेचा निषेध, समाजाचा आक्रोश आणि न्याय्य मागण्यांसाठी एकवटलेल्या मराठा समाजाचा पहिला मोर्चा क्रांतीचौक ते विभागीय आयुक्तालयावर ९ आॅगस्ट २०१६ रोजी धडकला. त्यानंतर राज्यभरात विविध जिल्ह्यांतून ५८ शिस्तप्रिय मोर्चे निघाले. मुंबईतील महामोर्चाने समाजाची खरी शक्ती दाखवून दिली. औरंगाबादमधील पहिल्याच मोर्चाने राज्याला दिशा दिली, शिवाय मोर्चातील गर्दी आणि शिस्त जगभर नावाजली गेली.

९ आॅगस्ट २०१६ रोजी सोशल मीडिया, कॉर्नर बैठका आणि विविध समाज संघटनांच्या बैठकींतून जिल्ह्यातून लाखो बांधवांनी या मोर्चाला लावलेली हजेरी आणि समाजाने घडविलेले शिस्तीचे दर्शन ‘भूतो न भविष्यती’ ठरले. ‘एक मराठा लाख मराठा’ ही ऐतिहासिक घोषणादेखील याच शहराने संपूर्ण राज्याला दिली. आकाशवाणी चौकात मराठा क्रांती मोर्चाचे पहिले कार्यालय सुरू झाले. समाजातील सर्व स्तरांतील बांधवांनी या कार्यालयात पहिली बैठक घेऊन मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आॅगस्ट २०१६ च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व पक्षांतील मराठा समाजाचे नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवला. उद्योजक, व्यापारी, अधिकारी, डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, गृहिणी फक्त ‘मराठा’ समाज म्हणून एकवटले. 

मराठा क्रांती मोर्चाची स्थापना आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ ऐतिहासिक घोषणा 
९ आॅगस्ट २०१६ म्हणजेच आॅगस्ट क्रांतिदिनी ‘मराठा क्रांती मोर्चा’ या मराठा समाजाच्या संघटनेच्या स्थापनेची घोषणा पहिल्या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’ ही ऐतिहासिक घोषणा याच शहराने दिली. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी याच नावाने मोर्चे, आंदोलने झाली. समाजाच्या सर्व संघटना, नेते राजकीय विचार बाजूला ठेवून एकत्रितपणे आरक्षणाच्या मागणीसाठी लढले. कीर्ती जाधव, ज्योती भोंडेकर, कन्या दहीभाते, प्रियंका शिंदे, अश्विनी पडुळे, सुनीता औराळे, राजश्री मोकासे या बिगर राजकीय युवतींनी विभागीय आयुक्तांना पहिल्या मोर्चाचे निवेदन दिले होते.४हीच परंपरा मराठा आरक्षणाच्या लढ्यात प्रत्येक जिल्ह्यातील मोर्चात कायम राहिली. बिगर राजकीय युवतींनीच निवेदन आणि समाजमनाचा आक्रोश प्रत्येक मोर्चात मांडला.

९ आॅगस्ट २०१६ ते २७ जून २०१९ पर्यंत आरक्षण लढा
९ आॅगस्ट २०१६ पासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजाने आरक्षणासाठी राज्यव्यापी लढा दिला. २७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण वैध ठरविण्याचा निकाल दिल्यानंतर ३४ महिन्यांत समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाने आपापल्या परीने मोर्चामध्ये योगदान दिले. ९ आॅगस्ट २०१८ रोजी महाराष्ट्र बंददरम्यान समाज रस्त्यावर उतरला. औरंगाबाद येथेच समाजाच्या आंदोलनासाठी राज्यव्यापी बैठका झाल्या. ४२ समाजबांधवांना आरक्षणासाठी हौतात्म्य आले. 

Web Title: Aurangabad remained at the center of the movement for the Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.