शिवसेनेसाठी ‘संभाजीनगर’ हा भावनिक नव्हे तर अस्मितेचा मुद्दा - अंबादास दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 19:47 IST2021-01-08T19:45:05+5:302021-01-08T19:47:00+5:30
Aurangabad Rename : भावनिक म्हणून नव्हे, तर अस्मिता म्हणून हा मुद्दा असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेसाठी ‘संभाजीनगर’ हा भावनिक नव्हे तर अस्मितेचा मुद्दा - अंबादास दानवे
औरंगाबाद : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करणे हा शिवसेनेच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे नामकरणासाठी पाठपुरावा सुरूच राहील. भावनिक म्हणून नव्हे, तर अस्मिता म्हणून हा मुद्दा असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
ठाकरे सरकारने डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी भागातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुंठेवारी भागातील जास्तीत जास्त मालमत्ताधारकांना फायदा करून देण्यासाठी शिवसेना प्रत्येक वॉर्डात मदत केंद्र सुरू करणार असल्याचेही आ. दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत होती. गुंठेवारीची मुदत वाढविण्याच्या प्रस्तावावर भाजप नगरसेवकांच्या सह्या आहेत, असा दावा भाजपा करीत आहे. गेली पाच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यावेळी हे विषय का मार्गी लागले नाहीत? असा प्रतिप्रश्न दानवे यांनी केला. महापालिका निवडणुकीमुळे संभाजीनगर नामकरण, गुंठेवारीसारखे भावनिक विषय शिवसेना समोर आणत आहे का ? या प्रश्नावर दानवे म्हणाले, अस्मितेचे मुद्दे उचलावेच लागतील. गुंठेवारी नियमितीकरणानंतर पीआर कार्डचा विषयही मार्गी लागेल.