‘सुपर संभाजीनगर’ फलक लावला कोणी ? स्मार्ट सिटी प्रशासनाकडूनच नामांतराचे बीजारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 01:12 PM2021-01-06T13:12:17+5:302021-01-06T13:14:41+5:30
Aurangabad renaming dispute : मागील महिन्यात टी.व्ही. सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा बोर्ड लावण्यात आला आणि हा बोर्ड सोशल मीडियावर झळकताच राजकारण ढवळून निघाले.
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात ठिकठिकाणी अत्याधुनिक फलक लावण्यात आले आहेत. ‘सुपर संभाजीनगर’ या बोर्डवरून राज्यभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरात उडी घेतली आहे. नामांतराच्या विषयाचे बीजारोपण स्मार्ट सिटी प्रशासनाकडून करण्यात आले. या पेटलेल्या प्रश्नावर महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ‘नो कमेंट’ एवढीच प्रतिक्रिया नोंदवली.
स्मार्ट सिटीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून टी.व्ही. सेंटर चौकात ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा फलक लावला आहे. यामुळे राज्यभरात संभाजीनगरच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला. सुपर संभाजीनगरचा फलक लावण्यास पालिकेने परवानगी कशी काय दिली? असा प्रश्न प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना प्रसारमाध्यमांनी मंगळवारी विचारला. तेव्हा त्यांनी ‘नो कमेंट’ म्हणत या मुद्यावर मौन बाळगले. मात्र, यावेळी आयुक्तांनी दिलेले स्मितहास्य काही वेगळेच सांगून गेले. स्मार्ट सिटीने हा बोर्ड लावलाच नसल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून पालिकेने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. शहरातील प्रत्येक चौकात या शहराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन सुंदर आर्ट इन्टॉलेशन बोर्ड लावण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत आजवर एन-१ सिडको येथे ‘लव्ह औरंगाबाद’ नावाचा बोर्ड लावण्यात आला. याचे विमोचन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. जालना रोडवरही अशाच पद्धतीचे बोर्ड अनेक ठिकाणी लावलेले आहेत. खडकेश्वर भागात शहराचा इतिहास सांगणारा ‘लव्ह खडकी’ या नावाने बोर्ड लावलेला आहे.
दरम्यान, या उपक्रमांतर्गतच मागील महिन्यात टी.व्ही. सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘सुपर संभाजीनगर’ नावाचा बोर्ड लावण्यात आला आणि हा बोर्ड सोशल मीडियावर झळकताच राजकारण ढवळून निघाले. राजकीय नेत्यांपासून ते विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून औरंगाबाद पालिकेने लावलेल्या या बोर्डवर टीका केली. काही जण पालिकेच्या या कृतीचे समर्थन करत आहेत, तर काहींकडून विरोध होत असल्याने शहरातील वातावरण तापलेले आहे. या बोर्डमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अहवाल पोलिसांनी वरिष्ठांना दिला.