औरंगाबाद आरटीओत दीडशेवर शिकाऊ चालक चाचणीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 05:24 PM2018-11-24T17:24:12+5:302018-11-24T17:27:16+5:30
मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहन आणि प्रशिक्षणात शासनाच्या अधिसूचनेनुसार बदल करण्याच्या सूचनेची दोन महिन्यांनंतरही अंमलबजावणी झालेली नाही.
औरंगाबाद : मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहन आणि प्रशिक्षणात शासनाच्या अधिसूचनेनुसार बदल करण्याच्या सूचनेची दोन महिन्यांनंतरही अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी आरटीओ कार्यालयात गेल्या दोन महिन्यांपासून अवजड वाहनांच्या लायसन्सची चाचणी प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे शिकाऊ लायसन्स काढलेल्या किमान दीडशेवर चालकांना (उमेदवार) मनस्ताप सहन करावा लागत आहे.
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने अवजड वाहनांच्या प्रशिक्षण पद्धतीत अनेक बदल केले. या बदलांनुसार चाचणीप्रक्रिया घेण्याचे आदेश देण्यात आले. शहरात ७ मोटार ड्रायव्हिंग स्कूल अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देतात. नव्या बदलांविषयी आरटीओ कार्यालयाकडून त्यांना माहिती देण्यात आली; परंतु ही माहिती अचानक प्राप्त झाल्याने डायव्हिंग स्कूलला बदल करण्यासाठी बदल करण्यात अडचणींना सामोरे जावे लागले.
प्रशिक्षणातील नव्या बदलासाठी आरटीओ कार्यालयाने २६ सप्टेंबरपासून ही चाचणी बंद केली आहे. अवजड वाहनाच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्यासंदर्भात मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांना नोटीस बजावण्यात आली; परंतु दोन महिन्यांनंतरही बदलांच्या पूर्ततेअभावी चाचणीप्रक्रिया सुरू झालेली नाही. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांकडे शिकाऊ लायसन्स आहे; परंतु चाचणी प्रक्रियाच बंद असल्याने पक्के लायसन्स कधी मिळणार, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
रोजगाराचा प्रश्न
आरटीओ कार्यालयात दररोज किमान २ ते ३ जणांची चाचणी होत असते. यानुसार किमान दीडशे जणांना चाचणीची नुसती वाट पाहावी लागत असल्याचे दिसते. लायसन्सअभावी रोजगाराच्या प्रश्नालाही अनेकांना तोंड द्यावे लागत असल्याची ओरड होत आहे.
हे बदल करणे आवश्यक
मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षण वाहनांत इंधन कार्यक्षमता मोजण्यासाठी योग्य उपकरण बसविणे, प्रशिक्षण कालावधीत इंधन कार्यक्षमतेची चाचणी ५ कि.मी.च्या ट्रॅकवर घेणे, इंधन कार्यक्षमतेसाठी वर्ग प्रशिक्षण देणे, आदी नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
लवकरच सुरुवात
अवजड वाहन लायसन्सची चाचणी बंद असून, लवकरच ती पूर्ववत सुरू होईल. त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. एकाच ड्रायव्हिंग स्कूलने बदल केलेला आहे; मात्र कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही.
- स्वप्नील माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी