ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात; लोकप्रतिनिधींचे तेच सल्ले अन् प्रशासनाची तीच उत्तरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:07 PM2021-04-27T16:07:17+5:302021-04-27T16:07:53+5:30
खाजगी रुग्णालयाकडून आकारण्यात येणारे बेहिशेबी बिल, डॉक्टर्स उपलब्ध न होणे, ऑक्सिजन सुविधेत वाढ करणे, इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड्स देण्याकडे लोकप्रतिनिधींनी सोमवारच्या बैठकीत लक्ष वेधले.
औरंगाबाद : कोरोना संसर्ग नियंत्रण उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय लोकप्रतिनिधींमध्ये मागील दहा महिन्यांपासून दर सोमवारी बैठका होत असून, खाटा, रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन उपलब्धतेसाठी काथ्याकूट सुरू आहे. लोकप्रतिनिधींनी वारंवार बैठकीत याच मुद्द्यावर सल्ले दिले, तर प्रशासनानेदेखील सोयीनुसारच उत्तरे देण्याची परंपरा कायम राखली आहे.
खाजगी रुग्णालयाकडून आकारण्यात येणारे बेहिशेबी बिल, डॉक्टर्स उपलब्ध न होणे, ऑक्सिजन सुविधेत वाढ करणे, इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड्स देण्याकडे लोकप्रतिनिधींनी सोमवारच्या बैठकीत लक्ष वेधले. दहा महिन्यांपासून याच मागण्यांचा पाढा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बैठकीत वाचला जात आहे. त्यावर जास्त बिल आकारणाऱ्या हॉस्पिटल्सची लेखापरीक्षकांमार्फत तपासणी केली जात आहे. अतिरिक्त रक्कम रुग्णास परत करण्याचे आदेश दिले असून, ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या लोकप्रतिनिधींसोबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह खा. डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, आ. अंबादास दानवे, आ. सतीष चव्हाण, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंह राजपूत, आ. प्रदीप जैस्वाल, आ. हरिभाऊ बागडे, मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. नीता पाडळकर, डॉ. सुधाकर शेळके, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी, आयुक्तांचा दावा असा
जिल्ह्यात सध्या ३४९ रुग्णवाहिका असून, १९२ उपचार सुविधांमध्ये २०,५७२ खाटा उपलब्ध आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन खाटा २५०८, तर आयसीयू खाटा ७६० आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर १.५७ असून, आता सीएसआर फंडातूनही व्हेंटिलेटर प्राप्त झाल्याचा दावा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केला. दुसरीकडे, मनपा आयुक्त पाण्डेय यांनी मेल्ट्रॉनमध्ये ऑक्सिजन व्यवस्था वाढविण्यात येत असून, पुरेशा प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवण्यात येत असल्याचा दावा केला.
लोकप्रतिनिधींचे सल्ले, सूचना अशा
खासगी डॉक्टरांनी रेमडेसिविर इंजेक्शनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली पाहिजे. अनेक डॉक्टर हे रुग्णांच्या नातेवाइकांना प्रिस्क्रिप्शनमध्ये रेमडिसिविर लिहून देत आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याचा सल्ला खा. डॉ. कराड यांनी दिला. आ. सावे यांनी सिपेटमध्ये ऑक्सिजन सुविधेत वाढ करण्याचे सुचविले. आ. शिरसाट यांनी मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे उपचारांची सुविधा असून, तिथे उपचार केंद्र सुरू करण्याचे सुचविले. आ. बागडे यांनी खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्यासाठी आदेश देण्याचा सल्ला दिला.