गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हेशाखेकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 05:13 PM2019-08-12T17:13:59+5:302019-08-12T17:16:09+5:30
पोलिसांनी पाठलाग करून घेतले ताब्यात
औरंगाबाद: कमरेला गावठी पिस्तूल लावून मिरवणाऱ्याला ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने कृष्णापुर शिवारात पकडले. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि तीन काडतुसे हस्तगत केली.
चरणसिंग शामसिंग काकरवाल(३०,रा. कृष्णापुर)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, कृष्णापुर येथील चरणसिंग नावाच्या तरूणाकडे एक पिस्तूल आहे. तो कमरेला पिस्तूल लावून फिरत असतो,अशी माहिती खबऱ्याने ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक संदीप सोळुंके यांना मिळाली.यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोळुंके, कर्मचारी विठ्ठल राख, श्रीमंत भालेराव,धीरज जाधव, दिपक नागझरे, रामेश्वर धापसे,रमेश सोनवणे यांच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला. तेव्हा तो कृष्णापुर येथील त्याच्या घराच्या परिसरात दिसला. पोलिसांना पाहुन तो पळून जाऊ लागला.
पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली असता तो उडवा,उडवीची उत्तरे देवू लागला. मात्र त्याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची पक्की खबर पोलिसांना असल्याने त्याला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेण्यात आली. घराच्या अंगणात वाळूमध्ये प्लास्टीक पिशवीत लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल आणि तीन काडतुसे पोलिसांच्या हाती लागले.