हायवा ट्रक पळविणारी आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 07:20 PM2020-02-17T19:20:47+5:302020-02-17T19:23:25+5:30

या टोळीतील गुजरातमधील चारही आरोपींविरुद्ध वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Aurangabad Rural police arrested highway truck theft gang | हायवा ट्रक पळविणारी आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांकडून अटक

हायवा ट्रक पळविणारी आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांकडून अटक

googlenewsNext
ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात चोरीच्या वाहनांचे सर्व भाग वेगवेगळे केले जातात. धुळे जिल्ह्यात तसेच पंजाबमध्ये वाहनांची विक्री

औरंगाबाद : हायवा ट्रक पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने गुजरातमधून अटक केली. अटकेतील सहा आरोपींकडून चोरीचा हायवा ट्रक, गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दोन कार, मोबाईल आणि रोकड, असा सुमारे ३४ लाखांचा ऐवज जप्त केला.

अब्दुल कलाम महंमद इस्लाम चौधरी (४०, रा. उडसाई, मेहेदराव, उत्तर प्रदेश, ह. मु. संग्रामपूर, गुजरात), दिवाकर ऊर्फ छोटू एकनाथ चव्हाण, शुबनेसकुमार दिनेशकुमार भाटिया (रा. गुजरात), मोहम्मद इस्तिखान मोहम्मद सफार खान (रा. गुजरात), शिवाजी अशोक लहिरे (रा. वांजरगाव, ता. वैजापूर) आणि त्याचा मेहुणा पिंटू ऊर्फ महेश भगवान बिरुटे ऊर्फ कहार (रा. अमरधाम, ता. नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. 
याविषयी अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १ जानेवारी रोजी संतोष सुखदेव बोरुडे (रा. डव्हाळा, ता. वैजापूर) यांचा हायवा चोरट्यांनी पळविला होता. अशाच घटना शेजारील जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडल्या. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शेजारील विविध ठिकाणी वाहन चोरीसाठी चोरट्यांनी वापरलेली पद्धत जाणून घेतली.

यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा संशयावरून शिवाजी लहिरे याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याचा मेहुणा पिंटू ऊर्फ महेश आणि गुजरातमधील अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून त्याने ट्रक चोरून नाशिक येथे नेल्याचे सांगितले. नंतर हा हायवा कलामने साथीदारांसह धुळे जिल्ह्यात नेल्याचे समजले. पोलिसांनी कलाम, दिवाकर ऊर्फ छोटू, शुबनेसकुमार, मोहम्मद इस्तिखान यांना सुरतमधील इच्छापूर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, औरंगाबादसह देशभरातील विविध राज्यांमध्ये ते वाहन चोरी करतात आणि धुळे जिल्ह्यात तसेच पंजाबमध्ये विक्री करतात. धुळे जिल्ह्यात चोरीच्या वाहनांचे सर्व भाग वेगवेगळे केले जातात. यानंतर बऱ्याचदा हायवाच्या चेसीस आणि इंजिन क्रमांक बदलून नवीन क्रमांक टाकून बनावट कागदपत्रांच्या आधारे हायवा ट्रक पंजाब, हरियाणा राज्यांत कमी भावाने विक्री करतात. या टोळीने पंजाबमध्ये विक्री करण्यासाठी तयार केलेला बनावट चेसीस क्रमांक असलेला ट्रक पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला. तर असेच अन्य दोन हायवा पंजाबमधील दिनानगर गावात उभे असल्याचे सांगितले. या टोळीतील गुजरातमधील चारही आरोपींविरुद्ध वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळुंके, भगतसिंग दुलत, कर्मचारी विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, श्रीमंत भालेराव, सुनील खरात, राजेंद्र जोशी, किरण गोरे, रमेश अपसनवाड, वाल्मीक निकम, योगेश तरमाळे, ज्ञानेश्वर मेटे, रामेश्वर धापसे, गणेश गांगवे, जीवन घोलप, संजय तांदळे यांनी केली आहे.

Web Title: Aurangabad Rural police arrested highway truck theft gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.