पोलिसांचा वचक आणि सतर्क नागरिकांमुळे महिलांसाठी औरंगाबाद सुरक्षित शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 08:01 PM2020-01-17T20:01:03+5:302020-01-17T20:05:15+5:30
रात्री, बेरात्री एकटी महिला, तरुणी कोठेही फिरू शकते
- बापू सोळुंके
औरंगाबाद : राजकीय, सामाजिक चळवळीचे प्रमुख केंद्र बनलेले औरंगाबाद महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी हेल्पलाईन नंबर, व्हॉटस्अप नंबर उपलब्ध केले. एवढेच नव्हे, तर दामिनी पथक सतत महाविद्यालयात आणि मुलींच्या वसतिगृहात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधते. यामुळे नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी एकट्या राहणाऱ्या महिला, मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे दिसून येते.
औद्योगिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहराचा चोहोबाजूने झपाट्याने विस्तार होत आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी बाहेरगावहून येथे येऊन एकटीने राहणाऱ्या महिला कामगार आणि विद्यार्थिनींची संख्या एक लाखाहून अधिक आहे. यातील काही जणी खोली किरायाने घेऊन राहतात, तर काही महिला, मुली वसतिगृहात राहतात. एकटीने राहणाऱ्या महिला, तरुणींना त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता वाटू नये याकरिता शहर पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. वसतिगृहातील प्रत्येक मुलीकडे पोलीस नियंत्रण कक्ष, दामिनी पथक आणि पोलिसांच्या हेल्पलाईनचे मोबाईल नंबर आहेत.
बाहेरगावाहून रात्री उशिरा बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे आल्यानंतर घरी जाण्यासाठी मदत हवी असेल तर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यास पोलीस त्यांच्या वाहनातून महिला, तरुणीला घरी नेऊन सोडतात. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पोलीस उपस्थित असतात. रेल्वेस्टेशन, महावीर चौक, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, हर्सूल टी-पॉइंट आदी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरेही सुरक्षा कवच म्हणून काम करतात. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत होत आहे.
प्रभावी दामिनी पथक
महिलांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी प्रत्येक ठाण्यांतर्गत महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतो. यामुळे तक्रारदार महिला त्यांना नि:संकोचपणे तक्रार सांगू शकते. दामिनी पथक नियमितपणे शहरातील विविध महाविद्यालये, मुलींच्या वसतिगृहात जाऊन मुलींशी संवाद साधते. त्यांच्याशी कोणीही गैरवर्तन करीत असेल, तर त्यांना थेट लॉकअपमध्ये डांबले जाते. यामुळे दामिनी पथकाने शहरात चांगलाच दबदबा निर्माण केला. या पथकातील उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांनी त्यांचे मोबाईल आणि व्हॉटस्अप क्रमांक दिले. काही वर्षांपूर्वी निर्जनस्थळी तरुणींवर अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन बीट हवालदार आणि दामिनी पथक निर्जनस्थळी गस्त घालतात.
कामावर येणे-जाणे सुरक्षित
शहरालगतच्या वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीत हजारो महिला कामगार आहेत. यातील अनेक महिला रात्री उशिरा कामावरून घरी परततात. शिवाय शहरात काम करणाऱ्या महिला कामगार, रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका, महिला डॉक्टर रात्री उशिरा कामावर जाऊ शकतात आणि बिनधास्तपणे घरी येऊ शकतात. अनेक विद्यार्थिनी रात्री उशिरापर्यंत अभ्यासिकेत असतात. रात्री उशिरा एकट्या घरी जाताना दिसतात. शहरातील सिनेमाघरात रात्री शेवटचा शो एक ते दीड वाजता संपतो. सिनेमा पाहून दुचाकीने अथवा रिक्षाने घरी परतणाऱ्या मुली, महिलांच्या चेहऱ्यांवर घरी पोहोचण्यासंदर्भात कोणतीही साशंकता नसते.
घरात घुसून लुटीची घटना अपवाद
१५ दिवसांपूर्वी शास्त्रीनगर येथे एका घरात घुसून वृद्ध मायलेकींना मारहाण करून लुटल्याची घटना घडली होती. प्राचार्य जीवन देसाई यांच्या घराच्या अंगणात येऊन दुचाकीस्वार चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा झाडून कामाला लागली आहे. रस्त्यावर छेडछाड, अत्याचाराच्या घटना रोखण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसून येते.