औरंगाबाद सेक्स रॅकेट प्रकरण : मॉलप्रमुखाच्या मोबाईलवर तरुणींची छायाचित्रे पाठविणारा एजंट अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 05:32 PM2019-12-13T17:32:18+5:302019-12-13T17:33:58+5:30
गुन्हे शाखेच्या कारवाई दरम्यान पोलिसांना पाहून पळाले होते दोन जण
औरंगाबाद : बीड बायपास परिसरातील राजेशनगर येथील कुंटणखान्यात पकडलेल्या मॉलप्रमुख आणि सहायक व्यवस्थापकांना मोबाईलवर तरुणींची छायाचित्रे पाठविणाऱ्या दलालास गुन्हे शाखेने रात्री अटक केली. अटकेतील आरोपीला न्यायालयाने १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मनोज गोविंदराव जाधव, (४०, रा. दहीहंडे गल्ली, चिकलठाणा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेने ७ डिसेंबर रोजी राजेशनगर आणि यशवंतनगर येथील वेगवेगळ्या कुंटणखान्यावर धाड टाकून पर्दाफाश केला होता. या कारवाईत रॅकेटचा स्थानिक प्रमुख संजय त्र्यंबक कापसे, आंटी तर दुसऱ्या अड्ड्यावरून विनोद नागवणे आणि अन्य आंटीला अटक केली होती. शिवाय मॉलप्रमुख महंमद अर्शदसह चार ग्राहकांना पकडले होते. तर दोन संशयित आरोपी पोलिसांना पाहून पळून गेले होते. पोलीस तपासात पळून गेलेल्यांपैकी मनोज जाधव आणि अन्य एका एजंटाचा समावेश असल्याचे दिसून आले.
मनोज जाधव हा कापसेचा साथीदार आहे. कापसेने आणलेल्या विविध ठिकाणच्या तरुणींची छायाचित्रे त्याने मॉलप्रमुख आणि सहायक व्यवस्थापक असलेल्या अमोल शेजूळ याच्या मोबाईलवर पाठविल्याचे पोलीस तपासात समोर आले. आरोपी मनोज आणि शेजूळ यांच्यात तसेच शेजूळ आणि अर्शद यांच्यात व्हॉटस्अॅपवर झालेले चॅटिंगही पोलिसांच्या हाती लागले होते. यातून या बड्या ग्राहकांना कुंटणखान्यापर्यंत आरोपी मनोज जाधवनेच नेल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने आरोपी मनोज जाधवला बुधवारी रात्री चिकलठाणा भागातून उचलले. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी आरोपीची पोलीस कोठडी मागितली. पोलिसांची विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपी मनोज जाधवला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
कुंटणखान्यावरून धूम ठोकली होती
गुन्हे शाखेने राजेशनगरातील कुंटणखान्यावर धाड मारली तेव्हा पोलिसांना पाहून दोन जणांनी तेथून धूम ठोकली होती. सामान्य नागरिक असतील म्हणून पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला नव्हता. पोलीस तपासात मात्र कुंटणखान्यावरून पळून गेलेल्या दोघांपैकी मनोज आणि अन्य एक जण होता. ते दोघेही कापसेचे एजंट असल्याचा पोलिसांना संशय होता. यापैकी मनोजला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.