औरंगाबाद हादरले! प्रेमप्रकरणातून संशोधक तरुणाने स्वत:ला पेटवून घेत तरुणीला कवटाळले
By राम शिनगारे | Published: November 21, 2022 03:35 PM2022-11-21T15:35:54+5:302022-11-21T15:38:51+5:30
दोघांची सध्या मृत्यूशी झुंज सुरु आहे.शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार करण्यात येत आहेत
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात पीएच.डी.चे संशोधन करणाऱ्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत संशोधक तरुणीला कवटाळले. ही घटना शासकीय विज्ञान संस्थेतील बायोफिजिक्स विभागाच्या प्रयोगशाळेत सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. यात तरुण ९० टक्क्यांपेक्षा अधिक, तर तरुणी ४० टक्क्यांपेक्षा अधिक जळाल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. मुलाची प्रकृती चिंताजनक असून, दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.
गजानन खुशालराव मुंडे (२९, ह.मु. पीएचडी वसतिगृह, विद्यापीठ, रा. दाबा दिग्रज, ता. जिंतूर, जि. परभणी) व पूजा कडूबा साळवे (२८, ह.मु. एन ७, रा. दहेगाव, ता. सिल्लोड) असे जळालेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; गजानन हा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागात पीएच.डी.चे संशाेधन करतो, तर पूजा ही शासकीय विज्ञान संस्थेच्या बायोफिजिक्स विभागात संशोधन करते. दोघांचे मार्गदर्शक एकच आहेत.
पूजाला रविवारी तिच्या एका सहकारी महिलेने विभागात बोलावून घेतले होते. तिच्यामागे गजानन हासुद्धा विभागातील प्रयोगशाळेत आला. त्याने येताच पाठीवरील बॅगमधून पेट्रोलची बाटली काढत स्वत:च्या अंगावर ओतून घेतली. काही पेट्रोल पूजाच्याही अंगावर फेकले. तेव्हा तिच्या सहकारी महिलेने तिला पळून जाण्यास सांगितले. तेवढ्यात गजानन याने प्रयोगशाळेचा दरवाजा बंद केला; तसेच त्याने लायटरने स्वत:ला पेटवून घेतले. त्याच्या अंगाने पेट घेताच त्याने पळत जाऊन पूजाला कवटाळले. पेट्रोल असल्यामुळे काही वेळातच आग सर्वत्र पसरली. पूजाने स्वत:ला त्याच्या तावडीतून सोडवून घेतले, मात्र तोपर्यंत तिचा चेहरा, डोक्याचा काही भाग जळाला होता. एकाएकी घडलेल्या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. संस्थेतील इतरांनी आग नियंत्रणात आणून दोघांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीत गजानन हा ९० टक्क्यांपेक्षा अधिक, तर पूजा ४० टक्क्यांपेक्षा अधिक जळाली आहे. गजानन याची प्रकृती गंभीर असून, दोघांवर ‘आयसीयू’मध्ये उपचार सुरू आहेत.
प्रेमप्रकरणातून झाली घटना
दरम्यान, गजानन आणि पूजाचे प्रेम संबंध होते. मात्र, काही महिन्यांपासून पूजा आणि गजाननमध्ये वाद सुरु होते. पूजा त्याला टाळत होती. यामुळे गजानन अस्वस्थ होता. यातूनच गजाननने आज स्वतःला पेटवून घेत पूजाला मिठी मारली, अशी माहिती आहे.