औरंगाबादमध्ये प्राध्यापकाचे बंद घर फोडून सहा लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 05:28 PM2018-02-12T17:28:27+5:302018-02-12T17:30:04+5:30
रेल्वेस्टेशन परिसरातील बन्सीलालनगर येथील द्वारकापुरीमधील बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन परिसरातील बन्सीलालनगर येथील द्वारकापुरीमधील बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना सोमवारी (दि.११ ) उघडकीस आली आहे. चोरीत सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे साडेपाच ते सहा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहिती अशी की,बन्सीलालनगरमधील द्वारकापुरी कॉलनीमध्ये राहणारे प्रा. राहुल प्रदीप अग्रवाल हे एमआयटी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. तर त्यांच्या वडिलांचा व्यवसाय आहे. दिल्ली येथे नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी अग्रवाल कुटुब मागील सहपरिवार तिकडे गेले होते. रविवारी (दि.११) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरी परतले असता त्यांना चोरट्यांनी घराची खिडकीची गज कापून चोरी केल्याचे समजले. या घटनेची माहिती त्यांनी वेदांतनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल आढे, गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे हे त्यांच्या दोन पथकांसह तेथे दाखल झाले.
चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला व बेडरूममधील आलमारीचे कुलूप तोडले. त्यात असलेली १४ तोळ्याचे सोन्याचे दागिने, सव्वा किलोची चांदीची भांडी व रोख १ लाख २५ हजार असा सुमारे साडेपाच ते सहा लाखाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.