औरंगाबाद :दंगा नियंत्रणासाठी विशेष प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:21 AM2018-03-17T00:21:19+5:302018-03-17T00:21:31+5:30
दंगेखोर हे काही दुश्मन नसतात, यामुळे त्यांना कशा प्रकारे नियंत्रणात आणावे, यासाठी पोलिसांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाला पुन्हा उजाळा देण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. चार्ली पोलीस बरखास्त करून शहरातील चार एसीपींकडे प्रत्येकी एक दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) तैनात केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दंगेखोर हे काही दुश्मन नसतात, यामुळे त्यांना कशा प्रकारे नियंत्रणात आणावे, यासाठी पोलिसांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाला पुन्हा उजाळा देण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येणार आहे. चार्ली पोलीस बरखास्त करून शहरातील चार एसीपींकडे प्रत्येकी एक दंगा नियंत्रण पथक (आरसीपी) तैनात केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी जनसंपर्क वाढवून जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घ्यावे, असे आदेश प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शुक्रवारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
मिटमिटा येथे कचरा टाकण्यास विरोध करणाºया आंदोलकांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला आणि दगडफेकीला जबाबदार धरून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना गुरुवारी शासनाने एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे सोपविला. भारंबे यांनी गुरुवारी रात्री पदभार स्वीकारला आणि आज दुपारी १२ ते २.३० अशी तब्बल अडीच तास शहरातील पोलीस अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीला पोलीस उपायुक्त डॉॅ. दीपाली धाटे-घाडगे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यासह सर्व सहायक पोलीस आयुक्त आणि आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्याचे निरीक्षक, गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम सेल, महिला तक्रार निवारण मंच आदी विभागाचे निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीनंतर भारंबे म्हणाले की, मिटमिटा येथील घटनेप्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सर्व पोेलीस ठाण्यांत कार्यरत पोलिसांना पोलीस म्हणून त्यांचे कर्तव्य काय, दंगलसदृश परिस्थिती प्रशिक्षित पोलिसांनी व्यावसायिक पद्धतीने कशी हाताळावी, याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश सर्व ठाणेप्रमुखांना देण्यात आले.
संयमाने बळाचा वापर करावा
दंगलसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जाताना पोलिसांनी त्यांना देण्यात आलेले सुरक्षा जॅकेट, हेल्मेट, लाठी, ढाल आदी साहित्य सोबत ठेवावे. आवश्यक तेव्हा बळाचा वापर करून समाजकंटकांना त्यांची जागाही पोलिसांनी दाखवावी. मात्र, हे करीत असताना आपण पोलीस आहोत याचे भान मात्र पोलिसांना असणे आवश्यक आहे. त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणानुसार त्यांनी परिस्थिती संयमाने हाताळावी, अशा प्रकारचे विशेष मार्गदर्शन त्यांना देण्यात येणार आहे.