शहागंज बसस्थानक ते 'बसपोर्ट' कडे औरंगाबाद ' एसटी'ची वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:41 PM2018-06-01T13:41:50+5:302018-06-01T13:44:38+5:30
शहरात मध्यवर्ती, सिडको बसस्थानकानंतर आता बसपोर्ट उभारण्याकडे 'एसटी'ची वाटचाल सुरु आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन १ जून रोजी साजरा होत आहे. या ७० वर्षाच्या कालावधीत 'एसटी' ने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. औरंगाबादेत एकेकाळी शहागंज आणि रेल्वेस्टेशन स्थानकातून बस धावत होत्या. शहरात मध्यवर्ती, सिडको बसस्थानकानंतर आता बसपोर्ट उभारण्याकडे 'एसटी'ची वाटचाल सुरु आहे. 'लालपरी' म्हणजे साधी बस, निमआराम बससोबतच शिवनेरी बरोबर वातानुकूलित शिवशाही बस दाखल झाली असून 'एसटी' खाजगी बससेवेला चांगलीच टक्कर देत आहे.
राज्यात पहिली एसटी बस १ जून १९४८ रोजी धावली. पुणे ते अहमदनगर मार्गावर लाकडी बॉडी आणि आजुबाजुला कापडी कव्हर लावलेली ही पहिली बस होती. एसटी महामंडळाची सुरुवात १९४८ मध्ये झालेली असली तरी मराठवाडा हा निजामाच्या जोखडात असल्याने तेव्हा औरंगाबादसह मराठवाड्यात निजाम स्टेट रेल्वे रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट या नावाने प्रवासी वाहतूक चालविण्यात येत होती. १९६० मध्ये मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा सुरू झाली. त्यावेळी मराठवाड्यात पाच जिल्हे होते. जिल्ह्याचे विभागीय कार्यालय औरंगाबादेत होते. त्यावेळी औरंगाबादेत रेल्वेस्टेशन आणि शहागंज येथे बसस्थानक होते. पहिले विभाग नियंत्रक म्हणून मेजर यु. जी. देशमुख कार्यरत होते.
सेवेत झाला कालानुरूप बदल
११ जून १९६४ रोजी औरंगाबादचे विभागीय कार्यालय सुरु झाले. ३ नोव्हेंबर १९७८ रोजी मध्यवर्ती तर २१ मार्च १९८६ रोजी सिडको बसस्थानक सुरू झाले. तेव्हापासून तर २०१८ या कालावधीत 'एसटी' ने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. औरंगाबाद विभागात मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानकासह सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर, सोयगाव, कन्नड ही आठ आगार आहेत. विभागात १५ फेब्रुवारी १९९९ रोजी पहिली महिला वाहक रूजू झाली. सध्या साधी बस, निमआराम बससोबतच अत्याधुनिक सेवाही सुरू आहेत. यात 'शिवनेरी' बरोबर वातानुकूलित शिवशाही आसन आणि स्लीपर बसही दाखल झाली. प्रवासी वाहतूक क्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेत एसटी महामंडळ दमदार वाटचाल करीत आहे. विभागीय कार्यशाळा व चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा कार्यरत आहे. मध्यवर्ती कार्यशाळेत जुन्या 'एस. टी.' च्या पुनर्बांधणीसह स्टील बॉडीच्या (माईल्ड स्टी) 'एसटी'ने आकार घेत आहे.
बसपोर्टची प्रतीक्षा
एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी अद्ययावत बसपोर्ट उभारण्याची दोन वर्षांपूर्वी घोषणा करण्यात आली; परंतु निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बसपोर्ट उभारणीची प्रतीक्षा करावी लागत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाऐवजी आता सिडको बसस्थानकात बसपोर्ट उभारणीसंदर्भात चाचपणी सुरू आहे.
वटवृक्षात रुपांतर
१ जून रोजी एसटी महामंडळ ७० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. राज्यात एका बसपासून सुरुवात झाली होती. आज त्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
- प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ
औरंगाबाद विभागातील परिस्थिती
बस प्रकार संख्या
साधी बस (लाल) -४५६
हिरकणी बस (निमआराम)- ५८
शिवनेरी बस - ८
शितल बस - ५
शिवशाही बस - ४१
शिवशाही स्लीपर बस - २
शहर बस - ४६
यशवंती (मिडी बस ) - १६
एकूण - ६३२
विभागातील दररोजची स्थिती
दररोज एकूण बस फेऱ्या - २ हजार ५७१
दररोज कि.मी.अंतर - १.९१ लाख कि.मी.
दररोज प्रवासी संख्या - १.६० लाख
दररोज उत्पन्न - ६० लाख रुपये