औरंगाबादेत सावरकर पुतळ्याची विटंबना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:04 AM2018-03-11T00:04:49+5:302018-03-11T00:04:57+5:30
पोलीस नियंत्रण कक्षापासून शंभर पावलावर असलेल्या समर्थनगरातील वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी काळी शाई टाकून विटंबना केली. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर संतप्त सावरकरप्रेमींनी रास्ता रोको करून निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पोलीस नियंत्रण कक्षापासून शंभर पावलावर असलेल्या समर्थनगरातील वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी काळी शाई टाकून विटंबना केली. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर संतप्त सावरकरप्रेमींनी रास्ता रोको करून निषेध नोंदविला. याप्रकरणी मनपाने क्र ांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
पुतळ्यांची विटंबना करण्याचे लोण शनिवारी औरंगाबादेत पोहोचले. समर्थनगरातील चौकात वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्यावर काळी शाई टाकून अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आला. यानंतर नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि विटंबना करणाºयाविरोधात घोषणाबाजी करू लागले. या पुतळ्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर शहर पोलिसांचा नियंत्रण कक्ष आहे. संपूर्ण शहरातील प्रत्येक हालचालीवर या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येते.
पोलिसांची २४ तास वर्दळ असलेल्या या पुतळ्याची विटंबना करून समाजकंटकांनी पोलिसांना खुले आव्हान दिले. ही घटना उघडकीस आल्यानंतर खासदार चंद्रकांत खैरे, आ.संजय शिरसाट, आ.अतुल सावे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आ.प्रदीप जैस्वाल, राजू वैद्य, नगरसेवक सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, गोपाल कुलकर्णी, सचिन झवेरी, माजी नगरसेवक समीर राजूरकर, किरण सराफ आणि सावरकरप्रेमींनी तेथे धाव घेतली. क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस बंदोबस्तात पुतळा स्वच्छ धुण्यात आला. पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
आरोपीच्या अटकेसाठी रास्ता रोको
या घटनेनंतर हजारो सावरकरप्रेमींनी पुतळ्याकडे धाव घेतली. आरोपींना तातडीने अटक करा, या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको केला. आरोपीला अटक झालीच पाहिजे. पुतळ्याची विटंबना करणाºयाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. आरोपींना तीन दिवसांत अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देणारे निवेदन स्वा. सावरकरप्रेमी मित्रमंडळाच्या वतीने पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांना देण्यात आले.