औरंगाबादेत जातात दररोज दोन वाहने चोरीस; ३ महिन्यांत १७५ दुचाकी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 06:00 PM2018-04-09T18:00:31+5:302018-04-09T18:16:55+5:30
चोरट्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी तब्बल पावणेदोनशे दुचाकी लंपास केल्याचे समोर आले.
- बापू सोळुंके
औरंगाबाद : शहर पोलिसांना चकमा देऊन चोरटे रोज वेगवेगळ्या भागांतून दुचाकी आणि अन्य वाहने पळवीत आहेत. चोरट्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी तब्बल पावणेदोनशे दुचाकी लंपास केल्याचे समोर आले. यात तीन ट्रकचा समावेश आहे.
शहरातील वाहनांची संख्या अकरा लाखांपर्यंत गेली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच दिवसेंदिवस शहरातील वाहनांच्या संख्येत भर पडत असते. प्रत्येक कुटुंबाकडे किमान एक आणि जास्तीत जास्त पाच ते सहा वाहने सध्या दिसून येतात. वाहनांची संख्या वाढल्यापासून वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला. यावर उपाय म्हणून प्रत्येक नागरिक घरासमोरील रस्त्यावर आपली वाहने उभी करतो. विशेषत: गुंठेवारी भागात तर दहा ते पंधरा फूट रुंदीच्या गल्लीत दोन्ही बाजूने दुचाकी उभ्या करून ठेवल्या जातात. काही कंपन्यांच्या दुचाकींचे स्वीच लवकर नादुरुस्त होते. परिणामी कोणत्याही वाहनाच्या किल्लीने ती दुचाकी सुरू होती.
रोज होणाऱ्या वाहन चोरींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही वाहनचालक त्यांच्या दुचाकींना साखळदंड बांधतात; मात्र ९० टक्के वाहनमालक वाहनांच्या सुरक्षितेबद्दल दुर्लक्ष करतात. त्याचाच लाभ चोरटे घेत असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांपासून शहरात दुचाकी चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे.
गतवर्षी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल ६३४ दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या होत्या. शिवाय २२ जीप आणि २१ ट्रक चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले.
चारचाकी वाहनांच्या चोऱ्या वाढल्या
२०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये दुचाकी चोरींची संख्या घटविण्यात पोलिसांना यश आले; मात्र वाहनचोरी कायमस्वरूपी रोखणे शक्य झाले नाही. परिणामी यावर्षीही वाहनचोऱ्या जोरात सुरू आहेत. जानेवारी ते मार्चअखरेपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांतून चोरट्यांनी तब्बल पावणेदोनशे दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. शिवाय तीन ट्रकचा यात समावेश आहे.
- २०१६ मध्ये चोरीला गेलेल्या दुचाकींची संख्या-८१७
- २०१७ मध्ये चोरीला गेलेल्या दुचाकी- ६३४
- २०१६ मध्ये चोरीला गेलेल्या दुचाकींची संख्या-८१७
- जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत चोरट्यांनी पळविलेल्या दुचाकी- १७३, ट्रक -३