स्कूल बसमुळे शाळकरी मुलाचा पाय निकामी; बसमध्ये घेण्याऐवजी पायावरून घातले चाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 05:38 PM2018-08-25T17:38:52+5:302018-08-25T17:40:29+5:30

स्कूल बसचालकाच्या चुकीमुळे पंधरावर्षीय विद्यार्थ्याचा उजवा पाय निकामी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता गांधेलीजवळ घडली.

In Aurangabad Students leg fractured due to school bus | स्कूल बसमुळे शाळकरी मुलाचा पाय निकामी; बसमध्ये घेण्याऐवजी पायावरून घातले चाक 

स्कूल बसमुळे शाळकरी मुलाचा पाय निकामी; बसमध्ये घेण्याऐवजी पायावरून घातले चाक 

googlenewsNext

औरंगाबाद : स्कूल बसचालकाच्या चुकीमुळे पंधरावर्षीय विद्यार्थ्याचा उजवा पाय निकामी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता गांधेलीजवळ घडली. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.ओम भाऊसाहेब वाघ (१५, रा. आडगाव बु., ता. औरंगाबाद) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयात इयत्ता नवव्या वर्गात शिकत आहे. बसचालक आरोपीचे नाव नवनाथ भुजंगराव घोडके (४०, रा. एकोड-पाचोड) असे आहे. 

चालकाने विद्यार्थ्याला रस्त्यावरील शेळ्या हाकलण्यासाठी खाली उतरविले आणि नंतर तो बसमध्ये चढत असतानाच बस पुढे घेतली. त्यावेळी रस्त्यावर कोसळलेल्या विद्यार्थ्याच्या पायावरून चाक गेले. भाऊसाहेब कारभारी वाघ (३७, रा. आडगाव बु.) यांचा मुलगा ओम झाल्टा येथील शिवछत्रपती विद्यालयात दोन वर्षापासून शिकतो. तो नियमित स्कूल बसने ये-जा करतो. गावातील इतर विद्यार्थीही त्याच्यासोबत असतात.

२३ आॅगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता स्कूल बस (क्र. एमएच-२० ईएफ २६९६) विद्यार्थ्यांना घेऊन आडगाव येथून निघाली. बस सकाळी सात वाजता गांधेली रोडने झाल्टा येथे जात होती. गांधेलीजवळ बससमोर शेळ्या आल्या. त्यामुळे चालक नवनाथ घोडके याने ओम याला खाली उतरून शेळ्या हाकलण्यास सांगितले. ओमनेही खाली उतरून शेळ्या हाकलल्या. त्यानंतर तो बसमध्ये चढत असताना चालकाने लगेच बस पुढे घेतली. त्यामुळे हेलपाटून ओम खाली कोसळला. विशेष म्हणजे लगेच एक चाक ओमच्या पायावरून गेले. यात त्याच्या पायाचा चुराडा झाला.

मुलासाठी केअर टेकर नाही
या शाळेत परिसरातील विविध गावचे विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेने करार करून खासगी बस भाड्याने लावल्या आहेत. पण, शाळेने बसमध्ये केअर टेकर ठेवलेला नाही. शिवछत्रपती विद्यालयाचा हा निष्काळजीपणा एका विद्यार्थ्याला आयुष्यभरासाठी जखमी करून गेला. विशेष म्हणजे त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने कुठलीही माणुसकी दाखविली नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. 

जखमीला रस्त्यावर सोडले
या स्कूल बसमध्ये ओमसह त्याची चुलत बहीणदेखील होती. अपघातानंतर चालक घोडके याने दोघांना तेथे सोडून दवाखान्यास जाण्यास सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नातेवाईकांना फोन करून अपघाताची माहिती दिली. भाऊसाहेब वाघ यांनी तात्काळ गांधेली येथे धाव घेऊन ओम याला बीड बायपासवरील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी लाखो रुपये खर्च सांगितला आहे.

कारवाई केली जाईल
शाळेचे मुख्याध्यापक आणि स्कूल बस मालक, चालक यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. केअर टेकर ठेवणे शाळेची जबाबदारी असते. चालकानेही विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घातला आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. गुन्हा दाखल असून त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल.
- सत्यजित ताईतवाले (सहायक पोलीस निरीक्षक चिकलठाणा)

Web Title: In Aurangabad Students leg fractured due to school bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.