औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही भीती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:10 AM2018-03-15T00:10:07+5:302018-03-15T00:10:13+5:30
कचरा प्रश्नावरून मिटमिट्यात दगडफेक व त्यानंतर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीमार... या घटनेचा परिणाम प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर खोलवर झाला असून, त्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती व चीड निर्माण झाली आहे. ‘पोलीसमामा नव्हे, हे तर गुंड,’ अशा शब्दांत बालकांनी आपली मने उघड केली. आठ दिवसांपासून कोणाचे वडील, कोणाचे काका, तर कोणाचा भाऊ घरात नाही. त्यांच्या आठवणीने काही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
प्रशांत तेलवाडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कचरा प्रश्नावरून मिटमिट्यात दगडफेक व त्यानंतर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीमार... या घटनेचा परिणाम प्राथमिक शाळेतील बालकांच्या मनावर खोलवर झाला असून, त्यांच्या मनात पोलिसांविषयी भीती व चीड निर्माण झाली आहे. ‘पोलीसमामा नव्हे, हे तर गुंड,’ अशा शब्दांत बालकांनी आपली मने उघड केली. आठ दिवसांपासून कोणाचे वडील, कोणाचे काका, तर कोणाचा भाऊ घरात नाही. त्यांच्या आठवणीने काही मुलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
मिटमिट्यातील दगडफेक व लाठीमारीच्या घटनेला आठ दिवस पूर्ण झाले; पण अजूनही या गावात पोलिसांची भीती कायम आहे. पोलीस अटक करतील या भीतीमुळे अनेक युवक मागील आठ दिवसांपासून गावात आलेच नाहीत. काही कुटुंबे घराला कुलूप लावून परगावी नातेवाईकांकडे मुक्कामी गेले. गावात लहान मुले, तरुणी, बायका,ज्येष्ठ नागरिकच आहेत. अटक केलेली आपली मुले कधी सुटून घरी परत येतील, या आशेने येथील ज्येष्ठ नागरिक दिवस-दिवस प्रतिक्षा करीत आहेत. दुसरीकडे येथील मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत आठवडाभरानंतर आज विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू आला. मात्र, बुधवारी ६२० पैकी केवळ २२१ विद्यार्थीच शाळेत आले होते. लोकमत प्रतिनिधींनी बुधवारी दुपारी शाळेला भेट दिली व मुलांची मने जाणून घेतली. तेव्हा ही मुले आतून कोलमडलेली दिसली. पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गातील मुला-मुलींमध्ये त्यादिवशीच्या घटनेचे भय अजूनही दिसत होते. चौथ्या वर्गातील कृष्णा म्हणाला की, त्याच्या पायावर पोलिसांनी दोन लाठ्या मारल्या. रामकिशन मगर म्हणाला की, शाळा सुटल्यानंतर आम्ही घरी जात होतो, माझ्या पायावर व हातावर पोलिसांनी लाठी मारली. आम्ही खूप घाबरलो होतो. रितेश क्षत्रियच्या पायावरही लाठी मारली होती. नंदिनी नरवडेच्या डोळ्यादेखत पोलिसांनी तिच्या वडिलांना बेदम मारले. पोलिसांची आम्हाला खूप भीती वाटते. ‘पोलीसमामा नव्हे, ते तर गुंड आहेत’, अशा संतप्त प्रतिक्रिया या शालेय विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. इयत्ता पाचवीतील ऋतिका म्हणाली की, आम्ही घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेलो होतो, तर पवन साबळे या विद्यार्थ्याने सांगितले की, त्यादिवशीपासून माझे पप्पा घरी आलेच नाहीत. पोलिसांनी माझ्या भावाला धरून नेले हे सांगताना आजमच्या डोळ्यात अश्रू तरळले
होते. घरातील टी.व्ही., कपाटाच्या काचा, संडासचा दरवाजा फोडला, आईलाही मारले, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. तुमच्यासमोर पोलीस आले, तर तुम्ही काय कराल, या प्रश्नावर बहुतांश विद्यार्थी म्हणाले की, ‘आम्ही बेंच खाली लपू.’ एवढी दहशत या बालकांमध्ये अजूनही दिसून येत आहे.