औरंगाबादमधील ‘बाटू’च्या उपकेंद्राचा प्रस्ताव लांबणीवर; वर्षभरापूर्वी झाली होती घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:15 PM2018-01-23T12:15:47+5:302018-01-23T12:19:17+5:30
मराठवाड्यातील बहुतांश महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’ची संलग्नता घेतली. मात्र, या महाविद्यालयांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारे उपकेंद्र वर्षभर लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन होणार असल्याची घोषणा एक वर्षापूर्वीच झालेली आहे. घोषणेनंतर मराठवाड्यातील बहुतांश महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’ची संलग्नता घेतली. मात्र, या महाविद्यालयांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारे उपकेंद्र वर्षभर लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनीही ‘लोकमत’शी बोलताना यास दुजोरा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर हे छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बाटू’चे उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. उपकेंद्र औरंगाबादला स्थापन करण्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. आता सरकारच्या पातळीवर निर्णय होण्याची गरज आहे.
सरकारकडून जेवढ्या लवकर उपकेंद्राला मान्यता मिळून निधीची तरतूद होईल, तेवढ्या लवकर विद्यापीठ हे उपकेंद्र कार्यान्वित करेल, असेही डॉ. गायकर यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या पातळीवर निधीची कमतरता असल्यामुळे प्रस्तावाला विलंब होण्याचीही शक्यता आहे. यामुळे औरंगाबादेतील विद्यापीठाचे उपकेंद्र आता पुढील वर्षीच सुरू होईल. या शैक्षणिक सत्रात सुरू होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलेली असल्याचेही डॉ. गायकर यांनी सांगितले.विद्यापीठ प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव दोन दिवसांत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही टाकण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पाहून विद्यापीठ कोणत्या दिशेने कार्य करीत आहे. हे सर्वांनाच समजेल, असेही ते म्हणाले.
मराठवाड्याबाबत दुजाभाव
केंद्र सरकार, राज्य सरकारकडून औरंगाबादेत मंजूर झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांसाठी निधी देताना राज्य सरकारकडून हात आखडता घेण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यासाठी मंजूर झालेल्या स्पा, आयसीटी, विधि विद्यापीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन संस्था अशा विविध संस्थांना पुरेसा निधी देण्यात आलेला नाही. यात आता आणखी ‘बाटू’च्या उपकेंद्राची नव्याने भर पडली आहे. हे केंद्र सुरू झालेले नसल्यामुळे महाविद्यालये, विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत.