औरंगाबादमध्ये शेतीमालाला मातीमोल भाव; दुष्काळानंतर शेतकऱ्यांना पालेभाज्या उत्पादनातही जबर फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:52 PM2018-11-28T13:52:01+5:302018-11-28T13:52:46+5:30
हातगाडीवर विक्रेते चढ्या भावात फळभाज्या विकत असले तरी अडत व्यवहारात मात्र शेतकऱ्यांना मातीमोल भाव मिळत आहे.
औरंगाबाद : पाण्याअभावी रबी पीक घेण्याऐवजी फळभाजीपाल्याचे उत्पादन घेतले; पण येथेही शेतकऱ्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. कारण भाजीमंडीत असो, वा हातगाडीवर विक्रेते चढ्या भावात फळभाज्या विकत असले तरी अडत व्यवहारात मात्र शेतकऱ्यांना मातीमोल भाव मिळत आहे. एकानंतर एक येणारे संकट बळीराजाची पाठ सोडण्यास तयार नाही.
पालक १० रुपयाला १० जुडी, मेथी १० रुपयाला ५ जुडी, अशा मातीमोल भावात विकली जात आहे, तर टोमॅटो २५० ते ६०० रुपये, कांदा १०० ते ७०० रुपये, दुधी भोपळा २०० ते ४०० रुपये, तर पत्ताकोबी १५० ते २५० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. दररोज भाजीमंडीत किंवा गल्लोगल्ली हातगाड्यांवर भाजी घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांकडून जे ग्राहक फळभाज्या विकत घेतात त्यांना हे भाव पाहिल्यावर धक्काच बसेल; पण हे सत्य आहे.
जाधववाडीतील अडत बाजारात मागील आठ दिवसांपासून याच भावात फळभाजीपाला विक्री होत आहे. सकाळच्या वेळी अडत बाजाराबाहेर बसलेले किरकोळ विक्रेते ओरडून-ओरडून पालक १ रुपया गड्डी, मेथी १० रुपयाला ५ गड्डी विकताना दिसून येत आहेत. या भावातही पालेभाज्या शिल्लक राहत आहेत. कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे सातत्याने भाव गडगडत असून, मंगळवारी तर १०० ते ७०० रुपये क्विंटलपर्यंत कांदा विक्री झाला. हाच कांदा बाजारात १२ ते २० रुपयांदरम्यान विकला जात आहे. २ ते ४ रुपये नग विकूनही उरलेला दुधी भोपळा आणखी कमी भावात विकावा लागत आहे.
यासंदर्भात दादाराव जोगदंडे या शेतकऱ्याने सांगितले की, खरिपाने दगा दिला. आता पाणी कमी असल्याने रबीचे पीक घेण्याऐवजी आम्ही पालेभाज्यांची लागवड केली, पण अडत बाजारातही मातीमोल भावात विकला जात आहे. आम्ही चोहोबाजूने संकटात सापडलो आहोत. वैजापूरहून कांदा घेऊन आलेल्या कल्याण काकडे यांच्या तर डोळ्यात पाणी आले. कारण, त्यांनी आणलेल्या ५० क्विंटल कांद्याला २०० ते ५०० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. आज ७२३ क्विंटल कांदा बाजारात आला. अडत बाजारात १०० ते ७०० रुपयांदरम्यान कांदा विक्री झाला. टोमॅटो, दुधीभोपळा, पत्ताकोबी, फुलकोबीचे ढीगचे ढीग अडत दुकानांसमोर पडलेले बघण्यास मिळत आहेत.
परराज्यातील कांद्याने भाव पडले
अडत व्यापाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रासह आता मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांतही कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. यामुळे कांद्याचा गड मानल्या जाणाऱ्या लासलगाव, नाशिक येथील कांद्याला परराज्यातून उठाव कमी झाला. परिणामी, कांद्याची स्थानिक बाजारात आवक वाढली आहे. दररोज ८० टनपेक्षा अधिक कांदा बाजारात येत असल्याने भाव गडगडले. मंगळवारी १०० ते ७०० रुपये क्विंटलदरम्यान कांदा विकला गेला.
बटाट्याची २०० टन आवक
बटाट्याचे अडत व्यापारी मुजीब खान म्हणाले की, डिसेंबर महिन्यात इंदूरच्या नवीन बटाट्याची आवक सुरू होणार आहे. सध्या इंदूर व आग्रा येथील शीतगृहात मोठ्या प्रमाणात बटाट्याचा साठा पडून आहे. करार संपुष्टात आल्याने शीतगृह मालकांनी जुना बटाटा बाहेर काढण्यास सांगितले आहे. परिणामी, बटाटा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणला जात आहे. जाधववाडीत आज २०० टन बटाट्याची आवक झाली व ६०० ते ८०० क्विंटलदरम्यान बटाटा विक्री झाला.