औरंगाबाद : रझाकार लाजतील एवढा नीच प्रकार; मारहाण पाहून अंगावर शहारे - सतीश चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 05:45 PM2018-03-11T17:45:55+5:302018-03-11T17:46:02+5:30
शहरातील कचरा टाकण्यास विरोध करणा-या मिटमिटा गावातील नागरिकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले आहेत.
औरंगाबाद : शहरातील कचरा टाकण्यास विरोध करणा-या मिटमिटा गावातील नागरिकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले आहेत. वृद्धापासून ते बालकांपर्यंत प्रत्येकाला घरात घुसून मारहाण केली. घरातील सामानाची पोलिसांनी तोडफोड केली. या गावातील तब्बल १२०० पुरुष पोलिसांच्या भितीने पळून गेले आहेत. हा अत्याचार रझाकारांना लाजवेल एवढ्या नीच पद्धतीचा आहे. या अत्याचाराचा आदेश देणाºया पोलीस अधिका-यांची मस्ती विधीमंडळात उतरविणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मिटमिट्यातील पोलिसी अत्याचाराची पदाधिका-यांसह पाहणी केल्यानंतर आ. सतीश चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते. मिटमिट्यात परीक्षा देऊन येणाºया दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. दोन्ही विद्यार्थी सध्या कोठडीत आहेत. ही रोजंदारी करणारी कुटुंबे आहेत. या विद्यार्थ्यांसह इतर अटक केलेल्या नागरिकांना पोलीस भेटूनही देत नाहीत. २० वर्षांपासून शहराचे खासदार असलेले चंद्रकांत खैरे हे प्रत्येक योजनेचे श्रेय घेतात. कच-याचे श्रेय मात्र घेत नाहीत.
भापकरांना उमेदवार व्हायचेय
कच-याची जिम्मेदारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घेतली असल्याचे वाचनात आले. मात्र या सर्व प्रकारावर महापालिकेचे आयुक्त काय करतात? ही सर्व जिम्मेदारी त्यांची आहे. अपयशही त्यांचे आहे. शहराचे खासदार ठेकदाराशी बंददाराआड चर्चा करतात आणि हे आयुक्त बाहेर दिडतास वाट पाहतात. अशा अधिकाºयांनी स्वाभिमानापोटी पदाचा राजीनामा द्यावा. यात भापकर कच-याची जिम्मेदारी घेतात. त्यांनी मनपात असताना काय दिवे लागले. आता त्यांना कोणत्यातरी पक्षाकडून उमेदवार व्हायचे असल्यामुळे जिम्मेदारी घेत असतील, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.
खैरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आम्ही मावळे असून, गनिमा काव्याचा वापर करून शहरातील कचरा बाहेरील गावांमध्ये टाकू, असे खा. खैरे यांनी सांगितले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी काव्याचा वापर शत्रूला पराभूत करण्यासाठी केला होता. शहराबाहेरील गावातील लोक शत्रू आहेत का? त्यांच्याबाबत खैरे असे बोलूच कसे शकतात. हा तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत अपमान केला आहे. याचे परिणामही खा. खैरे यांना भोगावे लागतील,असेही आ. चव्हाण म्हणाले.