मुले पळविण्याचा संशय; जमावाच्या तावडीतुन महिलेला सोडवले
By राम शिनगारे | Published: October 6, 2022 09:41 PM2022-10-06T21:41:42+5:302022-10-06T21:41:59+5:30
आंबेडकनगर परिसरातील घटना : सिडको पोलीस घटनास्थळी पोहचल्यामुळे अनर्थ टळला
औरंगाबाद : मुले पळवून नेण्यात येत असल्याच्या अफवा सोशल मिडियावरुन प्रसारीत केल्या जात आहे. त्याच संशयावरुन एका मानसिकदृष्ट्या कमकुमत असलेल्या महिलेला आंबेडकरनगर ग.नं. ३ परिसरातील जमावाने घेरले होते. त्या महिलेला काहीजणांनी मारहाणही केली. तेवढ्यात सिडको पोलिसांनी घटेनेची माहिती समजताच तात्काळ धाव घेत जमावाच्या तावडीतून महिलेची सुटका करीत ठाण्यात आणले. त्याठिकाणी चौकशी करुन महिलेला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
आंबेडकरनगर परिसरातील ग.नं. ३ च्या रस्त्यावर एक मानसिक उपचार सुरु असलेली महिला एका पाच वर्षाच्या मुलीला बोलताना नागरिकांनी पाहिले. तेव्हा त्यांना मुले पळविणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचा संशय आला. नागरिकांना महिलेला आडवून विचारपुस केली. महिलेला उत्तर देता येत नसल्यामुळे तिच्या दोनचार चापटाही मारण्यात आल्या. तेव्हा अधिक मोठ्या प्रमाणात जमाव जमला. त्या जमावातील एकाने सिडको पोलिसांनी घटनेची माहिती मिळाली. सिडको पोलिसांनी महिलेला मारहाण न करण्याच्या सूचना देत उपनिरीक्षक अशोक अवचार, कैलास अन्नलदास, कृष्णा घायाळ यांच्यासह हवालदार लाल खॉ पठाण, बिट मार्शलने धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर आवघ्या पाच मिनिटात सिडको पोलीस पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सिडको पोलिसांनी महिलेला जमावाच्या तावडीतुन सोडवत पोलिसांच्या गाडीत बसवून ठाण्यात आणले. त्याठिकाणी महिलेच्या नातेवाईकांनी बोलावून घेत अधिक चौकशी करीत ताब्यात दिले. नातेवाईकांनी महिलेवर मानसिक रुग्णाचे वैद्यकीय उपचार सुरु असल्याची कागदपत्रेही पोलिसांना दाखवली आहेत.
यापूर्वीही चार घटना उघडकीस
मुले पळविणारी टोळी असल्याच्या यापुर्वी चार घटना उघडकीस आल्या आहेत. या सर्व अफवाच निघाल्या आहेत. त्यातील तीन घटना औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात घडल्या आहेत. तर एक घटना जवाहरगनर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यासह ग्रामीणचे अधीक्षक मनिष कलवानया यांनी मुले पळविणारी टोळी अस्तित्वात नसून, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले आहे.