स्वच्छ भारत अभियानच्या पथकाकडून सोमवारी होणार औरंगाबादची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 05:07 PM2018-02-23T17:07:20+5:302018-02-23T17:08:57+5:30
शहरात २८०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचर्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण महापालिका कचरा कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचे पथक सोमवारी शहरात पाहणी दौर्यासाठी दाखल होणार आहे.
औरंगाबाद : शहरात २८०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचर्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण महापालिका कचरा कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचे पथक सोमवारी शहरात पाहणी दौर्यासाठी दाखल होणार आहे. शहराची ही बकाल अवस्था पाहता सर्वेक्षणात महापालिका ‘नापास’होण्याची दाट शक्यता आहे.
२६ ते २७ फेब्रुवारीला केंद्रीय पथक शहरात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. यंदा स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ४ हजार गुणांची स्पर्धा आहे. स्पर्धेत देशभरातील सुमारे ४ हजार ४१ शहरे सहभागी होत आहेत. राज्यातील नगर परिषदा, महापालिका मिळून २६५ शहरे स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झाली आहेत. केंद्र शासनाने नेमलेल्या कार्वी नामक एजन्सी यंदा सर्वेक्षणाचे काम करीत आहे. या एजन्सीचे किमान तीन अधिकार्यांचे पथक दोन दिवस शहरात स्वच्छतेच्या कामांची व विविध उपक्रमांची पाहणी करणार आहे. मनपाने सर्वेक्षणाशी संबंधित सर्व तयारी केली आहे. कागदोपत्री अहवाल तयार केलेला आहे. मात्र, शहरात अचानक कचरा कोंडी निर्माण झाली आहे. मागील ७ दिवसांपासून मनपाला शहरातील कचरा उचलता आलेला नाही. अनेक वसाहतींमध्ये कचर्याचे डोंगर साचले आहेत.
आज पालकमंत्री कचरा प्रश्नावर तोडगा काढणार आहेत. कचरा कोंडी फुटली नाही तर मनपाच्या सर्वेक्षणावर याचा परिणाम होणार आहे. मागील वर्षी औरंगाबाद शहराचा २९९ वा क्रमांक आला होता. २०१६ मध्ये औरंगाबाद शहर ५६ व्या क्रमांकावर होते. स्वच्छ सर्वेक्षणातील प्रमुख भाग असलेल्या स्वच्छता अॅपचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेला तीन वेळा मुदतवाढ मिळाली आहे.