सेक्रेटरी इलेव्हनच्या विजयात औरंगाबादचा स्वप्नील चमकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:47 AM2017-12-16T00:47:03+5:302017-12-16T00:48:13+5:30
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नाशिक येथे सुरू असलेल्या सिनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा स्वप्नील चव्हाण, मंगेश निगडे, प्रशांत कोरे आणि अक्षय पालकर यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सेक्रेटरी इलेव्हन संघाने डीव्हीसीए संघाने विजयासाठी दिलेले कठीण असे आव्हानही यशस्वीपणे पेलताना आपली विजयी घोडदौड कायम राखली.
औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे नाशिक येथे सुरू असलेल्या सिनिअर सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा स्वप्नील चव्हाण, मंगेश निगडे, प्रशांत कोरे आणि अक्षय पालकर यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर सेक्रेटरी इलेव्हन संघाने डीव्हीसीए संघाने विजयासाठी दिलेले कठीण असे आव्हानही यशस्वीपणे पेलताना आपली विजयी घोडदौड कायम राखली.
डीव्हीसीएने विजयासाठी सेक्रेटरी इलेव्हनसमोर ३४१ असे कठीण आव्हान दिले होते; परंतु सेक्रेटरी इलेव्हननेही कठीण आव्हान लीलया पेलताना ४९ षटकांत ५ गडी गमावून ३४१ धावा केल्या. विशेष म्हणजे गुरुवारी पीवायसीकडून नाबाद १३५ धावांची खेळी करणारा मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाण याने याही लढतीत आपला विशेष ठसा उमटवला. त्याने सेक्रेटरी इलेव्हनकडून सर्वाधिक ८ सणसणीत चौकार आणि एका टोलेजंग षटकारांसह ६० चेंडूंत ७७ धावांची विजयी खेळी केली. त्याच्याशिवाय प्रशांत कोरेने नाबाद ६६, मंगेश निगडेने ६२, अक्षय पालकरने ५७ धावांची खेळी करीत सेक्रेटरी इलेव्हन संघाच्या विजयात योगदान दिले. डीव्हीसीएकडून कार्तिक पलक याने ६८ धावांत २ गडी बाद केले.
तत्पूर्वी डीव्हीसीएने ५० षटकांत ६ बाद ३४० धावा ठोकल्या. त्यांच्याकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक १६० धावा फटकावल्या. विनय पाटीलने ८६ व सौरभ नवलेने ३५ धावा केल्या. सेक्रेटरी इलेव्हनकडून इंद्रजित ढिल्लनने ४६ धावांत २ गडीबाद केले. मंगेश निगडे व अक्षय पालकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
डीव्हीसीए : ५० षटकांत ६ बाद ३४०. (ऋतुराज गायकवाड १६०, विनय पाटील ८६, सौरभ नवले ३५. इंद्रजित ढिल्लन २/४६, मंगेश निगडे १/५४, अक्षय पालकर १/५०).
सेक्रेटरी इलेव्हन : ४९ षटकांत ५ बाद ३४१. (स्वप्नील चव्हाण ७७, प्रशांत कोरे नाबाद ६६, मंगेश निगडे ६२, अक्षय पालकर ५७, राहुल देसाई २५. कार्तिक पलक २/६८, कपिल गायकवाड १/५०, उत्कर्ष अग्रवाल १/४६).