औरंगाबादमध्ये एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, ३४६ विद्यार्थ्यांचे महापालिकेने घेतले स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 05:06 PM2021-12-23T17:06:11+5:302021-12-23T17:06:54+5:30
पॉझिटिव्ह शिक्षकाचा विद्यार्थ्यांसोबत संपर्क आला नसल्याचा शाळेचा दावा
औरंगाबाद : औरंगपुऱ्यातील प्रशालेत क्रीडा शिक्षकाचा कोरोना तपासणी अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझीटीव्ह आला. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांनी धसका घेतला. त्यामुळे सोबतच्या ५३ शिक्षकांनी बुधवारीच आरोग्य केंद्रात धाव घेवून आरटीपीसीआर तपासणी करून घेतली.
मंगळवारी पाचवी ते सातवी ४०३ तर बुधवारी ४६३ विद्यार्थी उपस्थित होते. तर पहीती ते दहावीच्या या शाळेत ५४ शिक्षक असून दुपारच्या बॅचला २२ शिक्षक आहेत. गुरुवारी शाळेत आलेल्या ३४६ विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब मनपाच्या आरोग्य विभागाने घेतले. तर काही विद्यार्थ्यांनी तपासणी करून घेतली नाही.
खबरदारी म्हणून गुरुवार आणि शुक्रवार प्रत्यक्ष वर्ग बंद करण्यात आले. तर शनिवारी आणि रविवारी सुटी असून सोमवारी शिक्षण विभाग, मनपच्या आरोग्य विभागाच्या सुचनेप्रमाणे पालकांशी चर्चा करून पुन्हा वर्ग भरवण्यासंदर्भात निर्णय शाळा घेणार आहे.
शिक्षकाचा विद्यार्थ्यांसोबत संपर्क आला नाही
दरम्यान, बाधित आढळून आलेले ५७ वर्षीय शिक्षक सोमवारी शाळेत तपासनी न करता आले. त्यानंतर दिलेल्या स्वॅबचा अहवाल मंगळवारी सायंकाळी मिळाला. त्यामुळे शाळेतील ३४६ विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर तपासणीला सामोरे जावे लागले. शिवाय शाळेच्या शिक्षकांनाही तीन दिवसांत दुसऱ्यांदा तपासणी करावी लागली. त्या शिक्षकांनी पुन्हा त्यांनी खाजगी रुग्णालयात फेर तपासणी करून घेतली. त्यातही बुधवारी पुन्हा अहवाल पाॅझिटीव्ह आला. त्यांच्यावर गृह विलगीकरणात उपचार सुरु असून त्यांना लक्षणे नाहीत. ते शिक्षक शाळेतही विद्यार्थ्यांच्या संपर्कात आले नसल्याचा दावा शाळेकडून करण्यात आला आहे.