औरंगाबाद @ ४२.३ अंश सेल्शिअस : यंदाच्या उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 01:15 PM2020-05-25T13:15:22+5:302020-05-25T13:22:32+5:30
उन्हाची दाहकता वाढत असल्याने नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
औरंगाबाद : काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असून, रविवारी शहरात ४२.३ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेने दिली. वाढत्या उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याचा अनुभव औरंगाबादकरांना येत आहे.
चिकलठाणा वेधशाळेत रविवारी (दि. २४) कमाल तापमान ४२.३ आणि किमान तापमान २८.८ अंश सेल्शिअस इतके नोंदविले गेले. शहरात शनिवारी ४२.२ अंश तापमान नोंदविले गेले होते. रविवारी तापमानामध्ये किंचित वाढ झाली. मे महिन्यात आतापर्यंत तापमान ४० ते ४१ अंशांदरम्यान नोंदविले गेले. गतवर्षीच्या तुलनेत मागील आठवडाभरात कमी तापमान राहिले.
कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांना यंदाच्या उन्हाळ्यात घराबाहेर पडता येत नाही. त्यात उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पसरतो. सायंकाळनंतरही प्रचंड उकाडा होता. तापमानाने औरंगाबादकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हापासून, उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी कूलर आणि पंखा वापरण्यासह दुपारच्या वेळी घरावर पाणी मारणे, असे वेगवेगळे उपाय करण्यावर नागरिकांकडून भर दिला जात आहे.
उन्हाची दाहकता वाढणार
आगामी आठवडाभर तापमान ४३ अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उन्हाची दाहकता वाढत असल्याने नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.