औरंगाबाद संपूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; जिल्हाधिकारी चव्हाण यांचे स्पष्ट मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 11:58 AM2021-03-26T11:58:06+5:302021-03-26T12:02:55+5:30
Lockdown in Aurangabad तारीख निश्चितपणे सांगता येणार नाही, पण लॉकडाऊनचा निर्णय होणारच आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केले असून, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनीही तसे संकेत दिले आहेत. दुसरीकडे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दुपारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता, लोकप्रतिनिधींकडून लॉकडाऊनबाबत सूचना आलेली आहे. आरोग्य विभागासह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. शहरात १०० टक्के लॉकडाऊन लागणार आहे. याचा निर्णय लवकरच होणार आहे. तारीख निश्चितपणे सांगता येणार नाही, पण लॉकडाऊनचा निर्णय होणारच आहे. पालकमंत्री देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पालकमंत्री देसाई म्हणाले, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. त्यामुळे अंशत: लॉकडाऊन केलेले आहे; परंतु आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पाऊल उचला, अशा सूचना आहेत. नांदेड, परभणी, बीडमध्ये लॉकडाऊन केलेले आहे. औरंगाबादमध्ये रोज दीड हजार रुग्ण सापडत आहेत. रुग्णवाढीचा वेग वाढतो आहे. ४ एप्रिल हा एक टप्पा आरोग्य विभागाने दाखविला आहे. त्यावेळी आताच्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण वाढत गेले, तर ते अडचणीचे ठरू शकेल. त्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा, अशा आरोग्य विभागाच्या सूचना आहेत.
आरोग्याला प्राधान्य
लॉकडाऊनमुळे मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रावर आणखी परिणाम होईल, याकडे लक्ष वेधले असता देसाई म्हणाले, प्राधान्य आरोग्याला दिले जाईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, तत्पूर्वी जनतेचे जीवन सुरक्षित करण्याला पर्याय नाही.
लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झालेली चर्चा अशी...
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आ. अंबादास दानवे यांनी, आगामी होळी आणि रंगपंचमी गर्दी करून साजरी न करण्याबाबत, तसेच जिल्ह्यात आंदोलने, मोर्चे यावर बंदी घालण्याबाबत सूचना केली. आ. प्रदीप जैस्वाल यांनी, रुग्णालये नसलेल्या आवारातील मेडिकल दुकाने बंद करण्याबाबत सूचना पालकमंत्र्यांकडे केली. आ. सतीश चव्हाण यांनी, जिल्ह्यात कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयात उपलब्ध बेड्सची माहिती देण्याबाबत सूचना केली. त्याचप्रमाणे जर लॉकडाऊनचा पर्याय निवडला, तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांसाठी शिवभोजन थाळीचा पर्याय उपलब्ध ठेवावा, असेही चव्हाण म्हणाले. लोकप्रतिनिधींच्या कोरोनाबाबत आढावा बैठकीत जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या, विविध रुग्णालयांत उपलब्ध असलेली बेड्सची संख्या, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयु बेड्सची संख्या, कोरोना तपासणी केंद्र, याबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती प्रशासनाने दिली.