औरंगाबादेत नोटा बदली प्रकरणाची चौकशी पूर्ण; मात्र दोषींना आरोपपत्र देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:21 PM2018-03-06T16:21:18+5:302018-03-06T16:21:41+5:30
एसटी महामंडळातील नोटा बदली प्रकरणात सुरक्षा व दक्षता अधिकार्यांकडून चौकशी केल्यानंतर अखेर काही अधिकारी, कर्मचारी दोषी आढळले आहेत; परंतु पंधरा दिवस उलटून अद्यापही दोषींना आरोपपत्र देण्यात आलेले नाही.
औरंगाबाद : एसटी महामंडळातील नोटा बदली प्रकरणात सुरक्षा व दक्षता अधिकार्यांकडून चौकशी केल्यानंतर अखेर काही अधिकारी, कर्मचारी दोषी आढळले आहेत; परंतु पंधरा दिवस उलटून अद्यापही दोषींना आरोपपत्र देण्यात आलेले नाही. दोषींना अभय देण्यासाठीच आरोपपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याची ओरड होत आहे.
एसटी महामंडळातील जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदली प्रकारावर गेल्या वर्षभरात पडदा पडला होता; परंतु काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता अधिकार्यांकडून चौकशी करण्यात आली. तेव्हा यामध्ये काही जण दोषी असल्याचा अहवाल नुकताच विभाग नियंत्रकांना देण्यात आला आहे. त्यामुळे वर्षभरानंतर किमान आता तरी नोटा बदलीप्रकरणी दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हा अहवाल प्राप्त होऊन १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्याने त्यावरून आरोपपत्र दिले जाणार असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले; परंतु अद्यापही आरोपपत्र देण्यात आलेले नाही. या प्रकरणामध्ये अडकू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवर संपर्क करून काही जण प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच इतर कामकाजाचे कारण पुढे करून आरोपपत्र देण्यास विलंब केला जात आहे, असा आरोप होत आहे.
अधिकारी म्हणतात...
सध्या यात्रेमुळे प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन केले जात आहे. लवकरच आरोपपत्र दिले जातील, असे एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधीक्षक यू. जे. पाटील यांनी सांगितले.